
सांगली, दि. 14 : अंमलीपदार्थ मुक्त सांगली जिल्हा याचा पुढील टप्पा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि व्यसन परावृत्ती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेल्या संयम (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way या प्रकल्पाच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचा जिल्हास्तरीय शुभारंभ नुकताच झाला. सांगली मिरजसह सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील जवळपास 600 शिक्षकांचा या प्रशिक्षणात सहभाग आहे. आठवड्याला एक अशा चार रविवारी हे प्रशिक्षण सत्र चालणार आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूदही पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नांनी कंपनी सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून उभा करण्यात आला आहे. भावी पिढीला अमली पदार्थापासून वाचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि व्यसन परावृत्ती जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संयम (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way हा प्रकल्प पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची संकल्पना, मार्गदर्शन व प्रोत्साहनाने सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या पुढाकाराने तर ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था, पुणे आणि संवेदना सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. शुभारंभ सत्रात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी प्रशासनिक मार्गदर्शन केले.
या उपक्रमानुसार ५ क्लस्टरमध्ये शिक्षक प्रशिक्षण केंद्रे पुढीलप्रमाणे – १) शिराळा व वाळवा तालुका — महाडिक इन्स्टिट्यूट, पेठ नाका २) कडेगाव व पलूस तालुका — किर्लोस्कर विद्यालय, पलूस, ३) जत व कवठेमहांकाळ तालुका — बाळासाहेब बापू गुरव हायस्कूल, कवठेमहांकाळ ४) आटपाडी व खानापूर तालुका — महात्मा गांधी विद्यालय, विटा ५) मिरज, तासगाव तालुका तसेच सांगली महानगरपालिका क्षेत्रातील शाळा – मिरज हायस्कूल, मिरज या सर्व केंद्रांमध्ये जिल्ह्यातील प्रत्येकी २५ शाळांमधील दोन शिक्षक, अशा एकूण जवळपास ६०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणासाठी ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि संवादिनी गट यांच्या २५ मुख्य प्रशिक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे स्त्री शिक्षकांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात अधिक होता.
संयम (Self Awareness in Youth for Anti Addiction Motive) JP Way या प्रकल्पाच्या मुख्य समन्वयक, मुख्य प्रशिक्षक व नियोजक अश्विनी देशपांडे, प्रज्ञा मानस संशोधिकेच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर आणि संवादिनी गटाच्या प्रमुख प्रशिक्षिका दीपा शेंडे यांनी प्रशिक्षणाच्या संकल्पना, विषयवस्तू आणि अध्यापन पद्धतीचे नियोजन केले. प्रकल्प फील्ड समन्वयक म्हणून सुरज रसाळ यांनी संपूर्ण जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे समन्वयन केले.
शिक्षकांनी एकूण चार दिवसांचे संयम प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या शाळेतील इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संयम प्रकल्पाची एकूण २४ सत्रे घेणार आहेत. या उपक्रमासाठी शिक्षकांना संयम प्रकल्पाचे विशेष लेसन नोट्स प्रदान करण्यात येतील. ज्यामध्ये कृती-आधारित उपक्रम, गटचर्चा नमुने आणि कार्यपत्रके समाविष्ट असतील.
या प्रशिक्षण शुभारंभास सांगली मनपा प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बीआरसी स्टाफ तसेच स्थानिक शैक्षणिक अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते.
प्रशिक्षणास शिक्षकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक राहिला. “या प्रशिक्षणातून आत्मसंयम, सकारात्मकता आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो,” अशी भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सौ. इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला विटाच्या शिक्षिका वैशाली कलमकर म्हणाल्या, नशामुक्ती कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आपल्या सर्व टीमच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर झाला. NEP च्या प्रशिक्षणानंतर तेच पंचकोश अगदी सोप्या भाषेत सहज समजेल, असे विविध उदाहरणांद्वारे व व्हिडिओद्वारे समजावून सांगितले गेले. त्यामुळे चांगले आकलन झाले व सर्व संकल्पना स्पष्ट झाल्यात. चांगल्या पद्धतीने व अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
==========================
जाहिरात साठी संपर्क:~7875707778
