कोल्हापूर दि,५ ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट १०ल़ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात आजवर कधीही न दिसलेल्या रूपात समोर येणार आहे. त्याच्या जोडीला प्रथमच मानसी नाईक दिसणार असल्याने ‘सकाळ तर होऊ द्या’बाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘सकाळ तर होऊ द्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली केली आहे. समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. दिग्दर्शक आलोक जैन यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. टीझर मागोमाग आलेल्या उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यात सुबोध आजवर कधीही न दिसलेल्या रूपात आहे. त्याच्या जोडीला सौंदर्य आणि नृत्याचा मिलाफ घडवत रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक आहे. या चित्रपटातील ‘नाच मोरा नाच…’ हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. याखेरीज ‘सकाळ तर होऊ द्या…’ हे शीर्षक गीत व ‘जगू दे मला…’ सारखी सर्व अर्थपूर्ण गाणीही रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आलोक जैन म्हणाले की, ‘सकाळ तर होऊ द्या’च्या रूपात आम्ही एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. यातील दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय दमदार असून, सुबोध आणि मानसी यांनी पूर्ण ताकदीनिशी त्या साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात अभिनयाची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळेल. त्या जोडीला कर्णमधूर संगीतही आहे. उत्तम सादरीकरण आणि वातावरणनिर्मिती या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रसिकांना एक वेगळ्या धाटणीची आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी रहस्यमय कलाकृती पाहायला मिळेल याची खात्रीही जैन यांनी दिली आहे.
ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचे संवादलेखन केले आहे. अभिषेक खणकर यांनी गीतलेखन केले असून, गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. छायांकन सुनील पटेल यांनी केले असून, सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.
=============जाहिरात===========