गांधीजी आणि मानवता
विशेष लेख

0 0

Share Now

Read Time:17 Minute, 59 Second

Media control news network

२ ऑक्टोबर गांधी जयंती विशेष लेख

२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा गांधी यांचे कार्य,त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम,दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले. त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे निस्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तूपाठ आहे.

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-बड्या कृतींमध्ये मानवतेचे मूर्त रूप आहे. ज्यामुळे त्यांचे जीवन हे केवळ राजकीय संघर्षाचे वर्णनच नाही, तर मानवतेच्या नात्याने केलेल्या अनेक प्रयोगांचे आणि त्यातून उमटलेल्या आदर्शांचा संग्रह आहे. दोन ऑक्टोंबरला त्यांच्या जयंती दिनाला आज त्यांच्या आयुष्यातील काही ठळक आणि भावपूर्ण मानवतावादी प्रसंगावर प्रकाश टाकणार आहोत. सत्याग्रह, उपोषण, अस्पृश्यतेविरुद्धचे प्रयत्न, स्वच्छतेचा आग्रह, प्रामाणिकपणा, अहिंसावाद, आहारविषयक संकल्प आणि दक्षिण आफ्रिकेतले त्यांचे अनुभव अशा अनेक उदाहरणांवरून महात्मा गांधी जगातील सर्वात मोठे मानवतावादी व्यक्तिमत्व आहेत हे निर्विवादपणे पुढे येते.

महात्मा गांधी आणि मानवता या विषयावर चर्चा करताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून सुरू केलेल्या त्यांच्या सत्याच्या प्रयोगाला.सत्याग्रहाच्या प्रवासाला आपल्याला विसरता येणार नाही. मोहनदास करमचंद गांधी यांचा गांधीजी होण्याचा प्रवास दक्षिण आफ्रिकेत सुरू झाला. १८९३ साली जेमतेम २४ वर्षाच्या मोहनदासांना दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासादरम्यान एका वाईट घटनेचा अनुभव आला. त्यांना वैध तिकिट असूनही पिएटरमारिट्झबर्ग येथे एका “व्हाईट्स-ओन्ली” ट्रेन कोचमधून जबरदस्तीने बाहेर काढले गेले. ही घटना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निर्णायक ठरली. सर्व मानव एकाच प्रभूची लेकरे असल्याचा विश्वास असणाऱ्या मोहनदासांना पुढे, ही घटना भयंकर लागून गेली. ती पहिली घटना आहे. ज्यातून त्यांना वर्णभेदाच्या, अन्यायाच्या विरोधात अहिंसात्मक प्रतिकाराचे साधन म्हणून सत्याग्रह वापरण्याची प्रेरणा मिळाली…पुढे जागतिक स्तरावरच्या वर्णभेद, जातभेद,धर्मभेद,हिंसा,अहिंसा या संदर्भातील मांडणी करताना त्यांच्याकडे या घटनेचा त्यांना भक्कम पाया मिळाला.

दक्षिण आफ्रिकेतील हा अनुभव त्यांच्या मनात कमालीची संवेदनशीलता जागृत करणारा ठरला. पुढे ते संपूर्ण आयुष्यभर शोषित, पिडीत,अशिक्षित अन्यायग्रस्त लोकांच्या बाजूने उभे राहिले. आपली मानवतावादी भूमिका जगापुढे मांडताना ही घटना त्यांना प्रेरक ठरली.गांधीजी आणि मानवता या विषयावर चर्चा करताना त्यांनी वापरलेले सत्याग्रहाचे शस्त्र शत्रूच्या हृदयात दया कशी पेरावी याचे उत्तम उदाहरण आहे. गांधीजींचे सत्याग्रह हे केवळ विरोधी-शक्तीवर दबाव आणण्याचे राजकीय तंत्र नव्हते; तो एक मानवतावादी प्रयोग आहे. ज्या प्रयोगात विरोधकाच्या मनातच करुणा, आत्म-परीक्षण आणि बदल उत्पन्न करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेला हा प्रयोग भारतात चंपारण, खेडा, आणि दांडी यात्रेसारख्या अनेक चळवळीपर्यंत परिणामकारक दिसून आला. सत्याग्रहाच्या तत्त्वांतून त्यांनी सांगितले की, विरोध करण्याचा मार्ग जर अहिंसात्मक व सत्यावर आधारित असेल, तर तो विरोधकाच्या मनावर प्रभाव करून त्यांनाही आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करतो. परिणामी सामाजिक बदल दर्शनी आणि आनंदाने घडतो. त्यांच्या या प्रयोगामुळे अनेक वेळा कायद्याच्या पुढे सर्वांना झुकवणाऱ्या बलाढ्य राजकीय शक्तीनाही नैतिकता व आपल्या अंतःकरणाच्या आवाजाने नकळत झुकावे लागले.

गांधीजी आणि मानवतावाद हा पैलू समजून घेताना त्यांनी सत्याच्या आग्रहासाठी वापरलेले उपोषण नावाचे आयुध आजच्या युद्धखोर वातावरणामध्ये किती उजवे ठरू शकते याचा प्रत्येय वेळोवेळी येतो. गांधीजींचे उपोषण हे त्यांचे वैयक्तिक शारीरिक कष्ट नव्हते. ते लोकांच्या हिंसक भावनांना क्षमवणारे आणि शांततेकडे वळवणारे एक प्रभावी साधन होते. विशेषतः १९४६-४७ च्या दंगलीच्या काळात त्यांनी केलेल्या उपोषणांनी अनेकवेळा सकारात्मक बदल घडविले. नौखली, बिहार आणि कोलकाता यांसारख्या ठिकाणी त्यांनी धर्माधारित दंगली थांबविण्यासाठी उपोषणाचा अवलंब केला. फक्त एक पंचा घालणाऱ्या सामान्य व्यक्तिमत्वापुढे या देशातील सर्व धर्म, पंथ आपला कट्टरवाद सोडून नतमस्तक व्हायचे. गांधीजींच्या रूपाने हे एकमेव उदाहरण भारताच्या इतिहासात आहे. अनेक वेळा त्यांच्या या निःस्वार्थ उपोषणाने हिंदू-मुस्लिम नेत्यांमध्ये संवादाचे सेतू निर्माण करणे शक्य झाले. नौखलीमध्ये त्यांनी चार महिने नि:शस्त्र आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय फिरून शांततेची चळवळ राबवली. त्यांच्या उपोषणाने लोकांच्या मनात करुणा निर्माण होऊन हिंसा कमी झाली; अशा प्रसंगांनी गांधीजींच्या मानवतावादी चरित्राला आणखी तेज दिले.

   मानवा मानवातील भेदाभेद हा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाला कधीच न आवडणारी बाब होती. मग ती दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय असो की भारतातल्या चातुवर्णीय भेदाभेद असो. हे सर्व अमान्य आहे. मानवतेच्या विरोधात आहे. हे गांधीजींनी ज्यावेळी त्यांना संधी मिळेल त्यावेळी मोठ्या व्यासपीठावरून लोकांपुढे मांडण्याचे काम केले. अस्पृश्यता निवारणामध्ये त्यांचे कार्य असेच अलौकिक आहे.

गांधीजींना समाजातील अस्पृश्यतेची परिस्थिती अपरिहार्य वाटत नव्हती. त्यांनी बहिष्कृत, अस्पृश्य मागास समाजाला ‘हरिजन’ म्हणून नव्याने सन्मान देण्याचा प्रयत्न केला. स्वतः समाजाच्या या वंचित शोषित घटकांमध्ये उतरून त्यांनी काम केले. अस्पृश्यतेविरुद्धच्या त्यांच्या चळवळींमध्ये त्यांनी समाजातील वरच्या स्तरातील लोकांनाही ज्या कामाला हलक्या दर्जाची व अपवित्र कामे समजली जातात ते करायला प्रवृत्त केले. या कृतींमागील उद्देश स्पष्ट होता. धर्म व वर्णाच्या नावाखाली लोकांना विभक्त करणाऱ्या मानवनिर्मित अवहेलनेला तोडणे आणि प्रत्येक मानवाला समान दर्जा देवून त्याला समाजात समाविष्ट करणे. गांधीजींचे हे प्रयोग स्वच्छतेला आणि मानवी आत्म-सन्मानाला जोडले होते. वर्धा येथे मुक्कामी असताना व उर्वरित आयुष्यातही त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेसाठी इतरांना कामी लावले नाही. ते स्वतः स्वतःचे शौचालय स्वतःचे बाथरूम स्वतः स्वच्छ करायचे. केवळ जातीवरून, धर्मावरून, वर्णावरून एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा कनिष्ठ कसा होऊ शकतो, हा भेद त्यांना कधीच मान्य नव्हता. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी गावोगावी स्वच्छता मोहिमा सुरू केल्या. स्वच्छता हा केवळ एका धर्माचा, एका जातीचा विषय नाही. प्रत्येक जण हे काम करण्यास बांधील असला पाहिजे हा संदेश त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून दिला. आरोग्य आणि स्वच्छतेकडे लक्ष दिल्याशिवाय समाजाची उन्नती अकल्पनीय आहे. त्यांनी गावोगावं स्वच्छतेचे व जन आरोग्याचे संदेश पेरले आणि लोकांना स्वतःचे शौचालय व साफसफाईची जबाबदारी स्वीकारायला प्रेरित केले. यातून जातीनिहाय वाटलेले अस्वच्छ कामे सुद्धा सर्वांची व सार्वजनिक झाली. मानवतावादी परिवर्तनासाठी हा गांधीजींचा मोठा लढा होता.

गांधीजींचा मानवतावाद हा केवळ मनुष्य प्राण्यांसाठीच नाही तर निष्पाप प्राणीमात्रांसाठीही मोठा लढा समजला पाहिजे. आपले अहिंसेचे विचार भारत भूमीत जन्मलेल्या भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्यासारख्या अहिंसावादी महापुरुषांच्या दाखल्यातून त्यांनी जनतेपुढे मांडले. जनतेला समर्पित केले.

गांधीजी बहुविध कारणांमुळे शाकाहारी होते. पारिवारिक परंपरा, नैतिक विचार आणि प्राणीसंवेदनाही त्यामागील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी अनेकदा सांगितले की जीवितांना दुख: देणे हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. आणि त्यामुळे त्यांची आहार निवड शाकाहारीपणाकडे झुकली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात यासाठी अनेक प्रयोग केले. त्यांचा आहार हा धार्मिकता किंवा परंपरेपुरता मर्यादित नव्हता; तो संवेदनशीलता आणि मानवतेशी जोडलेला आहे. त्यांच्या आहारावरील प्रयोग आणि विचारांबद्दल त्यांनी स्वत:च्या आत्मकथेत धैर्याने नोंद केली आहे. विस्ताराने नमूद केले आहे.

 गांधींजी संदर्भात बोलताना मानवता ही त्यांच्या वागणुकीतून,चारित्र्यातून,आहारातूनच व्यक्त होत होतीच. सोबतच त्यांची अपेक्षा राजधर्म देखील मानवतेतून पाळला जावा अशी होती. तुरूंगातील अमानवीय कायदे,कैद्यांना दिली जाणारी अमानवीय वागणूक याविषयी त्यांनी आपले मानवतावादी विचार मांडण्यात कुठेही कसर ठेवली नाही.

गांधीजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंग असे होते जेव्हा त्यांना तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली; तरीही त्यांनी तुरुंगातही मानवतेचा आदर जपला. तुरुंगात असतानाही ते पितृवत वागले, स्व:त:च्या सवयी बदलून इतर कैद्यांना समाजातील गरीब-शोषितांच्या बाबतीत विचार करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या तुरुंग अनुभवातून त्यांनी व्यवस्थेच्या अन्यायाला सामोरे जाताना सत्य आणि मानवतेचा मार्ग कसा राखायचा हे शिकवले.

गांधीजींचा मानवतावाद हा केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नाही किंवा केवळ दक्षिण आफ्रिकेपुरताच तो मर्यादित नव्हता. त्यांच्या मानवतावादाचा प्रभाव जगावर देखील दिसून आला आहे. त्यामुळेच गांधीजींचे मानवतावादी विचार जागतिक प्रेरणा, आदर्श बनले. जगातील सर्व देशांमध्ये त्यांचे पुतळे उभे आहेत. मानवतेसाठी ते कायम आदर्श आहेत. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, नेल्सन मंडेला आणि अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या तत्त्वांचा आधार घेतला आहे. अमेरिकेचे यापूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या संबोधनात अनेक वेळा गांधीजींच्या मानवतावादी विचाराचे दाखले दिले आहे. त्यांच्या मानवतावादी आदर्शांनी जगाला दाखवून दिले की, मानवतावाद आणि सत्याच्या मार्गाने केलेले प्रयत्न किती सामर्थ्यवान ठरू शकतात. भले तो संघर्ष फार विशाल नसेल. त्यांच्या पद्धतीने त्यांनी जगाला हे शिकवले की, सामर्थ्याच्या जागी नैतिकतेचा आणि समृद्धीच्या जागी सहिष्णुतेचा मार्ग अधिक टिकाऊ व मनापासून परिवर्तन घडवणारा असतो.

मीगांधीजींचे जीवन हे आपल्याला महत्त्वाचा धडा देते, ते म्हणजे मानवतेसाठी लढायचे असेल तर शस्त्राचा उपाय नको; संकल्प, सत्य, करुणा, अहिंसा आणि नैतिकतेच्या बळावरही आवश्यक बदल घडवता येतात. त्यांच्या सत्याग्रहाने, उपोषणाने, अस्पृश्यतेविरोधी प्रयत्नांनी, स्वच्छतेच्या संदेशाने आणि आहार व करुणेच्या तत्त्वांनी जगावर अमिट प्रभाव सोडला आहे. आजही जेव्हा आपण द्वेष, अत्याचार आणि असहिष्णुतेशी लढतो, तेव्हा गांधीजींची शिकवण आपल्याला माणुसकीच्या मार्गावरून पुढे नेत राहते. गांधीजींनी आपल्या जीवनशैलीतून मानवतावादाला मानवी जगण्याचा सर्वोच्च मार्ग असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. म्हणूनच गांधीजी सर्वकालीन सत्य आहे. त्यांचा मानवतावाद सर्व काळासाठी प्रेरणादायी आहे.

 ============जाहिरात===========

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *