सोलापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या निकालावरुन झालेला वाद ताजा असताना सोलापूर जिल्ह्यात कुस्ती साठी चांगलाच धुराळा उडालेला पहायला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवी झालेला महान मल्ल सिकंदर शेख याने बाजी मारली. त्याने आज थेट पंजाब केसरी स्पर्धा विजेता पैलवान भूपेंद्र सिंह याचा पराभव करून ‘भीमा केसरी किताब’ पटकावला आहे. या कुस्तींसाठी तब्बल ९ लाखांची बक्षिसं देण्यात आली.
मोहोळ तालुक्यातील टाकळी येथे भीमा साखर कारखान्याच्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील तब्बल ५०० हून जास्त पैलवानांनी या कुस्तीसाठी नाव नोंदवलं होतं.
पै. सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह यांच्यात आज भीमा केसरी स्पर्धेच्या निमित्त तुळ्यबळ अशी लढत झाली. या लढतीत सिकंदरने बाजी मारली. सिकंदरसाठी ही लढत अतीशय महत्त्वाची होती. कारण आताच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सेमीफायनल मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण सिंकदरने न डगमगता अतिशय बुद्धिमतेने आणि योग्य डावपेच लावत भीमा केसरीची गदा जिंकली
विशेष म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने देखील बाजी मारल्याचं पहायला मिळालं. महेंद्र गायकवाडने भीमा वाहतूक केसरी किताब पटकावला आहे.