कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह हे मतांचं राजकारण करण्यासाठी रविवारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण आलो तर आपले जनमत आणखी वाढेल असा अट्टहास त्यांनी धरला होता. पण त्यांच्या या अट्टहासा पाई किती निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला त्याला जबाबदार पूर्णपणे शिंदे सरकार आहे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र सरकारने रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा उन्हा मध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याचे पडसाद आता संपूर्ण राज्यासह देशात देखील उमटताना दिसून येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राजकारणाचं अध्यात्मिकरण झालं पाहिजे, ते अध्यात्माच्या पातळीवर गेलं पाहिजे. या लोकांनी आप्पासाहेबांकडून ते शिकलं पाहिजे. मात्र राजकारणाचं अध्यात्मिकरण करण्यापेक्षा अध्यात्माचं राजकारण कसं करता येईल, यासाठी शिंदे सरकारचा प्रयत्न सुरु आहेत”, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवार यांच्या कालच्या नाट्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘अजित पवारांनी आपली कालच भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटातील नेत्यांचे स्टेटमेंट पाहून हसायला येत आहे , शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. अजितदादांची स्क्रिप्ट ही उपमुख्यमंत्री यांनी लिहली असावी असा मला ठाम विश्वास आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजप कडून हे केले जात आहे. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते. या खेळाचे स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. हे नाट्य घडवलं तरीही पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणं आम्ही थांबवणार नाहीत. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असा इशारा अंधारे यांनी दिला आहे.