कोल्हापूर: टीव्ही पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, ती समाजाचा आरसा आहे. समाजातील घटना, समस्या आणि बदल यांचे प्रतिबिंब टेलिव्हिजन पत्रकारितेतून स्पष्टपणे दिसते, असे प्रतिपादन साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात ‘टेलिव्हिजन न्यूज प्रोडक्शन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत माजगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, टेलिव्हिजन क्षेत्रात सन २००० नंतर मोठे बदल झाले. दूरदर्शन हा टेलिव्हिजनच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातून टीव्ही पत्रकारितेची संकल्पना पुढे आली आणि सोशल मीडियामुळे ती आणखी बळकट झाली. समाजाची टेस्ट बदलली आहे, त्यामुळे पत्रकारांनी सतत नवे प्रयोग केले पाहिजेत. लोकांचे प्रश्न मांडणे हे पत्रकाराचे पहिले कर्तव्य आहे. आपल्या आवडीचे करिअर घडवण्यासाठी स्वतःचे बीट तयार करा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांचे स्वागत करताना विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा/मुंढे पवार, सोबत डॉ. शिवाजीराव जाधव, डॉ. अनुराधा इनामदार.
कार्यशाळेदरम्यान त्यांनी कॅमेरा व माईक हॅण्डलिंग, तांत्रिक बाबी, तसेच पत्रकारांसमोरच्या अडचणी आणि त्यांचा सामना करण्याच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अनुराधा इनामदार, शैलेश कोरे, माध्यम तज्ञ विवेक पोर्लेकर उपस्थित होते. कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मिस्त्री यांनी केले तर आभार रणजीत फगरे यांनी मानले.
—–जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात—–