कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३० : गोरगरीब बहुजनांचा पक्ष ही राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना झोपडीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. कागलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा व संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रताप उर्फ भैय्या माने यांचा सत्कार कागल तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीने झाला. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरीब, कष्टकरी, दिन, शोषित, उपेक्षितांसाठी आयुष्यभर झटत रहाणे, हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. गोरगरिबांची पेन्शन दरमहा एक हजाराहून दरमहा दोन हजार रुपये करणारच. तसेच त्यासाठीची उत्पन्न मर्यादा २० हजारांवरून ५० हजारांपर्यंत करू, असेही ते म्हणाले.
“कागलमध्ये शाहू सृष्टी उभारणार…………”
मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासनाच्या निर्देशानुसार साजरी करूया. सरकारने परवानगी दिली तर मोठ्या उत्साहात आणि नसेल तर मर्यादित उपस्थीती, अशा दोन्ही पद्धतीची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवा. हे वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणारी “शाहू सृष्टी” उभारू. तसेच, खर्डेकर चौकात छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळाही उभारू. मुश्रीफ म्हणाले, तुम्ही सर्वांनी रक्त आटवून कष्ट केल्यामुळेच माझे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व आहे. जनतेने दिलेल्या सत्तेचा विनयाने स्वीकार करूया. सत्तेपेक्षा जनतेने दिलेली ही सेवेची जबाबदारी मानूया, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले, सत्तेच्या यशोशिखरावर असताना या सत्तेचा दर्प नको. गोरगरीबांच्या सेवेसाठी कार्यरत राहा.
ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्याप्रमाणे विशेष सहाय्य खाते गोरगरिबांच्या दारात नेले. त्याच पद्धतीने कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनाही ते जनतेच्या दारापर्यंत पोहोचवत आहेत. व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, चंद्रकांत गवळी, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे, सूर्याजी घोरपडे, बाळासाहेब तुरंबे, विशाल पाटील, दिनकर कोतेकर, नारायण पाटील, डी. एम. चौगुले, सतीश घाडगे, सतीश पोवार, राजू माने, विवेक लोटे, एम. एस. पांडुरंग पाटील, शिवानंद माळी, दत्ता पाटील, कृष्णात पाटील, बळवंत माने, रमेश तोडकर आदी प्रमुख उपस्थित होते.