MEDIA CONTROL ONLINE
हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ८० एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर वाढदिवसानिमित्त लिहिले, ‘मुख्यमंत्री केसीआर गारु यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला कळविण्यात आनंद होत आहे की, अक्किनेनी कुटुंबाने चेंगिचेरला वन क्षेत्र अर्बन पार्कसाठी दत्तक घेतले आहे आणि याची पायाभरणी केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, अक्किनेनी कुटुंबाने जंगलाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांची देणगी देखील दिली आहे.
खासदार जे संतोष कुमार यांच्यासह नागार्जुन त्यांच्या कुटुंबियांसह पायाभरणी समारंभात सहभागी झाले होते. अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुलं नागा चैतन्य आणि निखिल आणि इतर कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. वनक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार २ कोटी रुपयांचा धनादेश हरिता निधीला दिला आहे.
नागार्जुन म्हणाले की, खासदार संतोष कुमार यांनी आपल्या राज्यात आणि देशात पर्यावरणास अनुकूल आणि आपले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक रोपं लावल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या बिग बॉस सीझनच्या अंतिम सोहळ्याला त्यांनी सांगितले होते की संतोष कुमार यांच्याशी वनभूमी दत्तक घेण्याबाबत चर्चा केली आणि स्टेजवर मी वनभूमी दत्तक घेणार असल्याचं घोषित केलं.