कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची लोकसभेतील पाटी कोरी झाली आहे. हे दोघे शिंदे गटाचे असल्याने दोन्ही मतदार संघावर त्यांचाच हक्क आहे. पण या मतदारसंघात भाजपचाच खासदार असावा असे भाजपचे प्रयत्न कायम आहेत. हीच अवस्था राज्यातील शिंदे गटाच्या बारा खासदारांच्या मतदार संघातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटातील खासदारांच्या मनात संभ्रमता निर्माण झाली आहे.
शिवसेनेत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या बारा खासदारांच्या जागा त्यांच्या हक्काच्या असल्या तरीही तेथे कमळ फुलविण्याची व्यूहरचना भाजपच्या वतीने सुरू आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपविण्यात आल्याची बातमी समोर येत आहे . यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांचा समावेश देखील आहे. देशातील १४४ तर राज्यातील १६ जागांवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचे खासदार निवडून यावेत यासाठी गेल्या सहा महिन्यापासून भाजपकडून वेगवेगळी रणनीती आणि फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
राज्यात शिवसेनेचे १८ खासदार होते. पण या पक्षात बंडखोरी झाल्याने त्यामधील बारा जण शिंदे गटासोबत गेले. यामुळे इतर लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गट व भाजप एकत्र निवडणूक लढण्याची जास्त शक्यता आहे. निवडणूक एकत्र लढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच्या हातात जाणार कोणती शंका नाही. याबदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेनेतून बंड करून गेलेले बारा खासदार सध्या संभ्रम अवस्थेत असल्याची बातमी समोर येत आहे यामध्ये हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा देखील समावेश आहे येत्या काळात ही परिस्थिती कोणता नवीन राजकीय भूकंप करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.