विशेष वृत्त अजय शिंगे
विराटच्या जिगरबाज खेळीने भारताने टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून विजयी प्रारंभ केला. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १५९ धावा चोपल्या. भारताने हे आव्हान ४ विकेट्स गमावत पूर्ण केले.
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही ४० धावांचे योगदान दिले. यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा फक्त धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हॅरिस रौफ याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच, नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूद याने अर्धशतक केले. त्याने ४२ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. या धावा करताना त्याने चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त इफ्तिखार अहमद यानेही अर्धशतक झळकावले. त्याने यावेळी ३४ चेंडूत ५१ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि ४ षटकारही मारले. तसेच, केवळ शाहीन आफ्रिदी यालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. तो १६ धावा करून तंबूत परतला. यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. कर्णधार बाबर आझम हा पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद होत तंबूत परतला.
भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार कामगिरी केली. या दोघांनीही प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हार्दिकने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप यानेही ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.