कोल्हापूर :
भाग -१
कोल्हापूर जिल्ह्याला विपुल निसर्गसंपदा लाभली असून जगभरातील पर्यटकांची पावले कोल्हापूरच्या दिशेने पडू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच महसूल विभागासह कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व सर्व विभागांच्या समन्वयाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. कोल्हापूरातील वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी.. इथली संस्कृती अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील गड-किल्ले, निसर्ग सौंदर्य, जंगले, अभयारण्य यासह संपन्न पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोल्हापूरला आवर्जून यायला लागतंय..! अशी साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीव्दारे घातली आहे. या मुलाखतीचा सारांश..
कोल्हापूर हा नैसर्गिक साधनसंपदेने नटलेला सुंदर जिल्हा आहे. जगाला भुरळ पाडणारी निसर्ग संपदा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पर्यटन सप्ताहासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा व श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी वाहतूकीची सोय, पार्किंगसह अन्य आवश्यक त्या सोयी- सुविधा उपलब्ध करुन देऊन पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची सोय होण्यास मदत होईल.
राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्यामुळं जगभरात कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. आजवर अनेक चळवळींची मुहूर्तमेढ कोल्हापूरमध्ये रोवली असून ही चळवळ देशभरात पसरली आहे. हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून राज्यभर साजरं होत आहे. कृतज्ञता पर्व दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व’ साजरे करण्यात आले. ६ मे या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनी जगभरात विविध ठिकाणी तब्बल 10 लाखांहून अधिक नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना दिली. हा उपक्रम विश्वविक्रम ठरला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कृतज्ञता पर्व सांगता समारंभात विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ‘ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे. कापड जत्रा, आंब्यांची जत्रा, आयटी एक्स्पो प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, कोल्हापुरातील जुन्या ऐतिहासिक वास्तू इमारतींच्या स्केचेसचे प्रदर्शन भरवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी रायगडावर पाडण्यात आलेले सुवर्ण होन पाहण्याची संधी लाभली तसेच एकाच दिवशी 350 हून अधिक ठिकाणी शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित व्याख्याने घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन, कथाकथन, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. इनोव्हेशन कॉम्पिटिशन, प्रदर्शन व स्टार्ट अप आणि गुंतवणूकदार समिट घेण्यात आले. या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी, तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना निश्चितच चालना मिळेल व रोजगार उपलब्ध होतील. कोल्हापुरी चप्पल दिवस, पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन, माती व बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, कोल्हापुरी मिरची- मसाला जत्रा, बचत गटांतील महिलांसाठी खाद्य जत्रेबरोबरच महा-ताल: वाद्य महोत्सव, शाहिरांचे पोवाडे, फुटबॉल, कुस्ती स्पर्धा, मर्दानी खेळ, अल्ट्रा मॅरेथॉन रन, सायकल रॅलीचे आयोजन करुन अनेक खेळांना आणि खेळाडूंनांही चालना देण्यासाठी प्रयत्न केला गेला.
पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवल्यामुळं राज्यात कोल्हापूर जिल्हयास सर्वोत्कृष्ट कामाबद्दल सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आलं. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं व्यापक कार्यक्रम हाती घेतला.
नागरिकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना बळ देण्यासाठी, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात स्टार्टअपला गती देण्यात आली असून शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असे मेळावे घेण्यात आले. जवळपास ५ हजारांहून अधिक लोकांनी त्या-त्या ठिकाणच्या मेळाव्यास भेटी दिल्या. यामुळे सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास चालना मिळेल. यातून लोकांमध्ये उद्योजकता निर्माण होवून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल. यामुळे जिल्ह्यात उद्योग विश्वाला चालना मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरिता स्वयंरोगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकते. तसेच केंद्र शासनाचा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, राज्य शासनाकडून औद्योगिक समूह विकास योजना, निर्यातीला चालना, उद्योजकता प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. यामधून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मिती झाली आहे.
भाग -२
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी व हक्कांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक ‘जनजागृती कार्यशाळा’ घेवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. दोन तृतीयपंथी व्यक्तींना सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात कंत्राटी पध्दतीने काम करण्याची संधी देण्यात आली असून तृतीयपंथीव्दांरे व्यक्तींच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.
तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डची सोय करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तृतीयपंथीयांबाबत संवेदनशील विचार करुन त्यांना सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) मध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती व नगरपालिका क्षेत्रात तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देवून अन्य नगरपालिकांना दिशा दिली आहे.
गणेशोत्सवादरम्यान होणारं प्रदूषण रोखण्यात प्रशासनास यश आलं आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रदुषण रोखण्याच्या उद्देशानं पंचगंगा नदीत श्री गणेश मूर्तींचं विसर्जन होवू नये, यासाठी गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात आले. याला नागरिकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. यावर्षीचा गणेश उत्सव हा पर्यावरणीय दृष्टिनं मैलाचा दगड ठरला.. संपूर्ण जिल्ह्यात नदी, नाले, तलावात गणेश मूर्ती विसर्जन न करता पर्यायी व्यवस्था नागरिकांनी स्वीकारली.
साधारणपणे तीन दशकांपासून सुरु असलेल्या या चळवळीला आता यश आलं आहे. यावर्षी सार्वजनिक पाणवठ्यावर गणेशमुर्तींचं विसर्जन न करता कोल्हापुरकरांनी परिवर्तनवादी चळवळीचं आणखी एक पाऊल टाकलं आहे. एखादी चळवळ चांगली असली की सर्व घटकातून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो, हे गणेशमूर्तीदान संकल्पनेतून दिसून आलं. यावर्षी पंचगंगा घाटावर एकही मूर्ती पाण्यात विसर्जित झाली नाही. अपवाद वगळता गणेशमूर्ती दान संकल्पनेसही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गणेश मुर्तींबरोबरच निर्माल्य जलस्त्रोतामध्ये गेलं नाही त्यामुळे जलप्रदूषण रोखता आलं आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न यशस्वी झाला.
क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असून कुस्ती, तिरंदाजी, मॅरेथॉन या सर्वच प्रकारच्या क्रीडा प्रकारासह लॉन टेनिस मध्ये सुद्धा जिल्ह्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक सुविधा आणि जमीन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महिला व बालकांच्या संरक्षणासाठी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. कोल्हापुरी गुळ हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या गुळाचा दर्जा, चव निराळी आहे. त्यामुळे याला जिओग्राफिकल इंडिकेटर्सचे प्रमाणपत्र (जीआय मानांकन) मिळाले आहे. गुळाची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच कोल्हापुरी गुळाला मोठ्या निर्यातीच्या गटांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.
जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा चांगला असून इथले विद्यार्थी पारंपरिक व्यवसायांकडे न जाता स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोल्हापुरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. हेच प्रमाण आणखी वाढण्यासाठी जिल्हास्तरावरुन स्पर्धा परीक्षांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांची सर्वांगीण तयारी करुन घेणारे सारथी संस्थेचे उपकेंद्र जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिने मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटलसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
भाग -३
कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक दृष्ट्या वरदान मिळालेला जिल्हा आहे. येथे पावसाचे प्रमाण चांगले असून येथील मातीही अतिशय सुपीक आहे. नद्या, सिंचनाच्या व्यवस्था आणि शैक्षणिक, आर्थिक प्रगती या सर्वांमुळे इथल्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. नगदी पिकांचे प्रमाणसुद्धा खूप चांगले आहे. येथे ऊस हे महत्त्वाचे पीक असून भात, भुईमूग आणि सोयाबीन यासारखी पीकेही घेतली जातात.
येथील साखर उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून जास्तीत जास्त एफआरपीची रक्कम देणारा तसेच सर्वात आधी शेतकऱ्यांना एफआरपी देणारा जिल्हा अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्याला हेक्टरी 125 टन पर्यंत घेऊन जाण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्हा नियोजन समिती मधूनही त्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे माहितीपट बनवणे, त्यांच्या शेतावर शेती शाळा आयोजित करणे, शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये काय करावे, कोणते नवीन उपक्रम हाती घ्यावे यासह ऊसाचे उत्पादन वाढण्यासाठी या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर जास्तीत जास्त करणे, खतांचा वापर कमी किंवा नियंत्रित करणे आणि सोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने ऊस उत्पादन घेऊन हेक्टरी 125 टन ऊसाचे उत्पन्न घेण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत.
दुग्ध उत्पादनात जिल्ह्याला आणखी पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अधिक पतपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दुग्ध उत्पादनाच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था -संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, आजरा, भुदरगड, चंदगड यांसारख्या डोंगराळ भागातील उत्पन्न वाढीच्या दृष्टीने दुग्ध उत्पादन, रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बांबू लागवड यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगडमधील काही भागांमध्ये मध उत्पादनाचे एक चांगले क्षेत्र आहे. या भागात अतिशय चांगल्या दर्जाची मध उत्पादने तयार होत आहेत. खादी आणि ग्रामविकास विभागामार्फत ‘मधाचे गाव’ आणि रेशीम उत्पादनासाठी ‘रेशमाचे गाव’ उपक्रमासाठी जिल्ह्यामध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी देखील या उद्योगांना चांगला प्रतिसाद देत असून गावागावांमध्ये याविषयीचे नियोजन सुरु झाले आहे.
पर्यटन वाढीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाणारं श्री अंबाबाईचं मंदिर, श्री क्षेत्र ज्योतिबा, नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर, वास्तुशिल्पकलेचा अद्वितीय नमुना असणारं खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर अशी धार्मिक पर्यटन स्थळं कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यासह अन्य धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक व अन्य विविध प्रकारची पर्यटन स्थळं या जिल्ह्यात आहेत. कागल औद्योगिक पंचतारांकित वसाहत, उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असणारी इचलकरंजी, चांदीसाठी प्रसिध्द असणारी हुपरी अशी औद्योगिक स्थळे इथं आहेत. तर ऐतिहासिक पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जाणारे पन्हाळगड, विशाळगड, पारगड, रांगणा, पावनगड, सामानगड, गगनगड असे अनेक गडकिल्ले इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देतात.
याशिवाय रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, टाऊन हॉल म्युझियम, राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि स्मृतीस्थळ, गव्यांसाठी प्रसिध्द असणारे राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य, कण्हेरी मठ, रामलिंग, राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पनेतून साकार झालेलं स्वयंचलित दरवाजे असणारं राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, राऊतवाडी धबधबा, पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथील व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क हे साहसी पर्यटक केंद्र तसेच देवगिरी कृषी पर्यटन केंद्र पहायलाही पर्यटक येतात. खाद्य संस्कृतीसाठी कोल्हापूर सर्वपरिचित आहे. तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, वडापाव यासह अनेक नानाविध चविष्ठ पदार्थांची चव कोल्हापुरात चाखायला मिळते. या ठिकाणचा गुळ, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, बेडगी मिरचीला जगभरात मागणी आहे. या बाबींमुळे जगभरातील पर्यटक कोल्हापूर जिल्ह्याला भेट देतात..
कोल्हापूरची संपन्न संस्कृती, इथली माणुसकी, कोल्हापुरकरांचा मोकळेपणा व खरेपणा हे सर्व अनुभवण्यासाठी कोल्हापूरला नक्कीच आलं पाहिजे. कोल्हापूरची खाद्य संस्कृती, मसाले, कलाकुसर, हस्तकला, हुपरीतील चांदीचे दागिने आणि चांदी उद्योग तसेच इथली संपन्न शेती, अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात येणारे कृषी पूरक व्यवसाय, टेक्स्टाईल इंडस्ट्री, धातू उद्योग पाहण्यासाठी पर्यटकांनी इथे यायला हवे. खास करुन येथील संपन्न पर्यटनस्थळे, किल्ले, निसर्ग सौंदर्य, जंगले, अभयारण्य पाहण्यासाठी तर आवर्जून कोल्हापूरला यायलाच लागतंय…!