कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. ३ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३४ प्रमाणे दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी या ठिकाणी जोतिबा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीची परिस्थिती विचारात घेवून जुने आंब्याचे झाड, (दानेवाडी क्रॉसिंग) ते जुने एस.टी.बसस्थानक, मेन पार्किंग- यमाई पार्किंग ते गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा, दानेवाडी फाटा ते दानेवाडी क्रॉसिंग या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.