Media Control News Network
कोल्हापूर : कोणताही देश तेव्हाच प्रगतीपथावर पोहोचतो जेव्हा देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालतात. गेल्या कित्येक वर्षात स्त्रीविषयी समाजाच्या दृष्टिकोनात निश्चितच फरक पडला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे यासाठी अनेकांनी लढा दिला आणि त्याला बहुतांश प्रमाणात यशही आले आहे. आज विविध स्तरावर, वेगवेगळ्या क्षेत्रात महिला बरोबरीने कार्यरत दिसतात. सामाजिक पातळीवरही स्त्रीला मतदानाचा हक्क मिळाला. वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळाला. मूलाला जन्म देणे किंवा न देणे या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क मिळाला. समानतेचा हा आलेख जरी चोख दिसत असला तरीही आजही एका बाबतीत मात्र स्त्रियांना आजही समान हक्क मिळाला नाही आहे. तो म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा हक्क.
गेल्या काही काळात मेट्रो सिटी किंवा शहरात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत स्त्रियांनी हा हक्क बजावला आहे परंतु त्याचाही किती गवगवा झाला. खेडोपाडी तर हे अशक्यच आहे. अनेक ठिकाणी महिलांना अंत्यसंस्कार विधीला येण्याचीही मुभा नाही. यामागे काही शास्त्रीय कारणे असतील तर त्याचा नक्कीच विचार करायला हवा परंतु सरसकट स्त्रीला हा हक्क नाकारणे अयोग्यच आहे. या कळीच्या मुद्द्याला टेलिव्हिजनच्या माध्यमातून मांडण्याच्या प्रयत्न होतोय सन मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या सुंदरी या मालिकेतून. सुंदरी ही मालिका मूळातच समाजातल्या स्त्रीच्या सौंदर्याच्या रुढ कल्पनांवर ताशेरे ओढते. या मालिकेतील नायिका रुढार्थाने रंग रुप नसलेली असल्याने तिचा पती पत्नी म्हणून तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. परंतु मूळातच हुशार, कर्तबगार असलेली सुंदरी तिच्या दिसण्यावर मात करत स्वत:ची ओळख बनवते, या आशयावर ही मालिका आधारलीये. याच मालिकेतील आगामी भागात सुंदरी तिच्या वडिलसमान सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करताना दिसेल. गावागावात आजही जिथे मुलीला आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्काराचा हक्क नाही तिथे एखाद्या सूनेला हा हक्क मिळणे तर दुरापास्तच. समाजाने आखून दिलेली ही सीमारेषा सुंदरी ओलांडणार आहे.
मालिका हे तर केवळ निमित्त परंतु त्यानिमित्ताने याविषयी लोकांना जागृत करणे, स्त्रियांना हा समान हक्क मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, हा आमचा हेतू असल्याचे सन मराठी आणि मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. पुढच्या आठवड्यात सन मराठीवर रात्री १० वाजता सुंदरी मालिकेत प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. तुम्हालाही हा विचार पटत असेल तर तुमच्या सोशल मिडियावर #isupportsundari#sunmarathi हा हॅशटॅग वापरुन तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..