मुंबई : राज्याचा राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांची राष्ट्रीय मान्यता रद्द केल्याचा अहवाल दिल्याचं वृत्त पीटीआयच्या हवालाने समोर आली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला एकप्रकारे प्रमोशन दिल्यासारखा निर्णय घेतला आहे. कारण निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला केंद्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार आहेत. याशिवाय नागालँडमध्ये त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. पण असं असताना निवडणूक आयोगाने त्यांची केंद्रीय पक्ष म्हणूनची मान्यता रद्द केली आहे.
नियमांनुसार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.