मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबर विधान परिषदेचे एक आमदारही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. डॉ. गोऱ्हे ठाकरे गटाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. ठाकरे गटातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप बरोबरची शिवसेनेची युती तुटल्यानंतर ठाकरे यांची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. त्यानंतर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. मनिषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आपण एका संविधानिक पदावर असल्याने याचे उत्तर देणार नाही निलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता निलम गोऱ्हेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.त्यामुळे साधारण आपण विचार केला तर ठाकरे गटाला गळती लागल्याचे बघायला मिळते. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी असा अचानक निर्णय कसा काय घेतला यासंबंधी चर्चाहोताना बघायला मिळत आहे.