खासदार धनंजय महाडिक यांचे राज्यसभेत लक्षवेधी मागणी
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापुर संस्थानात अनेक विकासात्मक योजना आखल्या. त्यातूनच कोल्हापुरात विमानसेवा सुरू झाली. लवकरच देशाच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीत नव्या टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यापूर्वीच कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.
छत्रपती राजाराम महाराजांनी दुरदृष्टीतून कोल्हापूर संस्थानात विमानसेवा सुरू केली. त्यामुळे कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी थेट राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. कोल्हापूरच्या विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, याबद्दलचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत करण्यात आला होता. आता कोल्हापूरच्या विस्तारीत आणि नव्या टर्मिनल बिल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच देशाच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वीच कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.