राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

0 0

Share Now

Read Time:7 Minute, 51 Second

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 ते 30 जून 2024 दरम्यान शोभायात्रा, व्याख्याने, परिसंवाद, वृक्षारोपण, बचतगटांचा मेळावा, हेरिटेज वॉक असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. 

        राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. या जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली होती. यानंतर या सप्ताहात व वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बेठक घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक डॉ. इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉ. जे. के.पवार, आर. के. पोवार, गणी आजरेकर, राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या देविका पाटील, तहसीलदार सैपन नदाफ, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे जगभरात कोल्हापूरची वेगळी ओळख आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचार अंगिकारले. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी जीवनभर महान कार्य केले. शाहू महाराजांचे विचार व त्यांचे कार्य जिल्ह्यासह राज्य व देशभरात पोहोचवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी 26 जून या त्यांच्या जयंती दिनी, तसेच या सप्ताहात व या वर्षभरात विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 

या महोत्सवात शाहू महाराजांच्या विविध पैलूंवर आधारीत 150 व्याख्याने, परिसंवाद, दिंडी, पदयात्रा, शोभायात्रा, वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याबरोबरच शाहू महाराजांचे विचार विद्यार्थी व युवकांमध्ये रुजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांसह अन्य विविध उपक्रम व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक भागांत विविध विभागांच्या सहभागातून वर्षभर घेण्याचे नियोजन सुरु आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

     ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दसरा चौकात असणाऱ्या शाहू स्मारक भवनमध्ये वर्षभर व्याख्याने व अन्य महत्त्वपूर्ण कार्यक्रम, प्रदर्शन आयोजित करण्यात येतात. या शाहू स्मारक भवन इमारतीचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे. शाहू स्मारक भवनचे बांधकाम, शाहू जन्मस्थळ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने 2 हजार आसन क्षमतेचे सभागृह आदी कामांसाठी तसेच वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी शासन स्तरावरुन आवश्यक निधी मिळावा, असे आवाहन करुन यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवावा, अशी अपेक्षा समितीच्या वतीने डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांसाठी भरीव योगदान दिले आहे. जयंती उत्सव वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरील भव्य कृषी व ग्रंथ प्रदर्शन आयोजित करावे. शाहू महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर आयोजित करावेत. तसेच शाहू महाराजांच्या जीवन कार्याची ओळख करुन देणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन, महितीपट (शॉर्ट फिल्म मेकिंग) स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले.

 शाहू महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी वर्षभर राष्ट्रीय स्तरावरील विविध मार्गदर्शनपर, प्रबोधनात्मक कार्यक्रम जिल्ह्यात घ्यावेत, अशी अपेक्षा वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केली.

     शाहू महाराजांची ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, यासाठी शासनाने निधी वितरीत करावा, या वर्षभरात राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा कोल्हापुरात घेण्यात याव्यात. शाहू महाराजांनी उभारलेल्या व शाहूकालीन वास्तूंचे जतन व संवर्धन, दुरुस्ती, सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम राबवावी, वृक्षारोपण व्हावे, शाहू महाराजांचे विचार व कार्य पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याख्यानमालांचे आयोजन, कृषी प्रदर्शन, बचत गट मेळावा, राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा, शाहिरी पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, असे आवाहन समिती सदस्यांनी केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *