या वर्षीपासून पत्रकारांनाही पुरस्कार देऊन सन्मान करण्याची घोषणा मनोहर जगताप यांनी केली.

0 0

Share Now

Read Time:8 Minute, 58 Second

‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित

संध्याकाळची प्रसन्न वेळ..वातावरणात काहीसा गारवा…चित्रपट, नाटकांशी संबंधितांना ओढ नामांकने घोषित होण्याची..पावले केशवबागेकडे वळलेली..शानदार सूत्रसंचालन…मधूनच गाणी आणि नाच.. चित्रपट आणि नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रीपैकी कुणाची घोषणा होते, याकडे लक्ष लागलेले..अखेर ते क्षण येत गेले…आपल्या आवडत्या कलाकृतीला आणि आवडत्या कलाकाराची घोषणा जेव्हा होत होती, त्या वेळी केशवबाग टाळ्यांच्या गजराने दुमदुमत होती… हे दृश्य होते ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने घोषित करण्याच्या वेळचे. दरवर्षी या सोहळ्याची चाहते तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत असतात. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा हा दुसरा मोठा पुरस्कार सोहळा असल्याने या पुरस्कारावर नाव कोरले जावे, असे अनेकांना वाटत असते. पुण्यातील डी. पी. रोड, कर्वे नगर येथील केशव बागमध्ये ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ नामांकन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ सोहळ्याची नामांकने घोषित झाल्याने कोणकोणते कलाकार-तंत्रज्ञ पुरस्कारांवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होतात, हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
या नामांकन सोहळ्यामध्ये ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. मोटिवेशनल आरती बनसोडे, ‘रेस्क्यू टीम’च्या सायली पिलाणे, समाजसेवक सिस्टर लुसी कुरियन, चित्रकार पूजा धुरी, शेतकरी ताराबाई पवार, समाजसेवक तेजस्वी सेवेकरी, समाजसेवक ज्योती सचदा, नेमबाज अदिती गोपीचंद स्वामी, समाजसेवक अहिल्याबाई बर्डे या नवदुर्गांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या नवदुर्गांनी केलेल्या कामाच्या ध्वनिचित्रफिती जेव्हा दाखवल्या जात होत्या, तेव्हा सामान्यांतील असमान्यत्वाची प्रचिती येत होती. साहजिकच उपस्थितांनी त्यांच्या कार्याला सलाम ठोकला नसता, तरच नवल. या ‘नवदुर्गां’चा सन्मान अभिनेते मकरंद अनासपुरे, ‘ओमा फाऊंडेशन’ संचालक अजय जगताप, लेखक श्रीनिवास भणगे, ‘आर्यन ग्रुप’चे अध्यक्ष मुकुंद जगताप, ‘आर्यन ग्रुप’ संचालक संजय शेंडगे, सागर कानडे आदींच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. ‘ओमा फाऊंडेशन’च्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरुप २१हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मान पत्र असे होते. पूजा धुरी यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र जेव्हा ‘आर्यन ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक मनोहर जगताप यांना देण्यात आले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक अंतिम पुरस्कार सोहळा’ गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होणार असून लवकरच याची तारीख घोषित करण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी दिली जाणारी रक्कम ‘ओमा फाऊंडेशन’कडून वितरित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात एकूण २३ विभागांमध्ये १३ लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यात प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके आणि चित्रपटांचाही समावेश आहे. ‘श्यामची आई’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच दिग्दर्शन, अभिनेत्री, गायिका (आभा सौमित्र आणि रुचा बोंद्रे), कला दिग्दर्शन, रंगभूषा, ध्वनिमुद्रण, संकलन, वेशभूषा, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, लक्षवेधी अभिनेता, बालकलाकार अशा तब्बल १४ विभागांमध्ये नामांकन मिळवण्यात यश मिळवले आहे. तिकिटबारीवर धडाकेबाज बिझनेस करणाऱ्या ‘झिम्मा २’ या चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत ‘बापल्योक’, ‘एक दोन तीन चार’, ‘स ला ते स ला ना ते’ हे चित्रपट आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट-समीक्षकांमध्ये ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘चौक’, ‘तेरवं’, ‘शक्तिमान’ आणि ‘स ला ते स ला ना ते’ यांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी शशांक शेंडे, आदिनाथ कोठारे, निपुण धर्माधिकारी, सिद्धार्थ चांदेकर, सुनील बर्वे यांच्यामध्ये, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी किरण खोजे, मृण्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे, गौरी देशपांडे, रिचा अग्निहोत्री यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. लक्षवेधी अभिनेता/अभिनेत्रीच्या पुरस्काराच्या शर्यतीत नम्रता संभेराव, संदीप पाठक, भगवंत श्यामराज आणि महेश मांजरेकर हे कलाकार आहेत.


भरत जाधव अभिनीत ‘अस्तित्व’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत, लक्षवेधी अभिनेता अशा दहा विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकासोबतच दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाश योजना अशी एकूण सात नामांकने मिळाली आहेत. याखेरीज सर्वोत्कृष्ट नाटकांच्या यादीत ‘जर तरची गोष्ट’, ‘अस्तित्व’, ‘आज्जीबाई जोरात’, ‘चाणक्य’ या नाटकांचा समावेश आहे. प्रायोगिक नाटकांच्या यादीत ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’, ‘सांगते ऐका’, ‘तुझी औकात काय? ’, ‘मून विदाउट स्काय’, ‘कलगीतुरा’, ‘ये जो पब्लिक है’ या नाटकांनी नामांकन मिळवले आहे. सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ या नाटकातील मुख्य व्यक्तिरेखांसाठी गिरीजा ओक आणि सुव्रत जोशी यांना नामांकने मिळाली आहेत. अभिनेत्यांच्या यादीत ललित प्रभाकर, आनंद इंगळे, प्रणव सपकाळ, उमेश जगताप, सिद्धार्थ बोडके, तर अभिनेत्रींच्या यादीत मानसी कुलकर्णी, मल्लिका सिंग हंसपाल, अश्विनी कासार, वैष्णवी आर पी, प्रतीक्षा खासनीस व निकिता ठुबे या कलाकारांचा समावेश आहे. या सोहळ्याचे सूत्र संचालन आदिती सारंगधर आणि अस्ताद काळे यांनी केले तर नृत्याविष्कार अमृता धोंगडे आणि वैष्णवी पाटील यांचे होते.
या वर्षीपासून पत्रकारांचा सन्मान
‘आर्यन ग्रुप’ वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान करीत असते. या वर्षीपासून पत्रकारांनाही सन्मान करण्याची घोषणा मनोहर जगताप यांनी केली. पुरस्काराचे स्वरुप लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *