कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला खिंडार — हर्षल सुर्वे यांचा राजीनामा!
कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. रविकिरण इंगवले यांच्या जिल्हाप्रमुख पदी निवडी नंतर हे नाराजी नाट्य समोर आल आहे.
“साहेब, माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही म्हणून मनातील खद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, तीच जास्त जीव्हारी लागली. आजपर्यंत आदेश मानूनच काम केले, कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला — निर्णय मान्य नसेल तर निघून जा. मला निर्णय मान्य नाही, म्हणून साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे,” असे हर्षल सुर्वे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
सुर्वे यांनी आपला राजीनामा शिवसेना सचिव विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर आणि उपनेते संजय पवार यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला असल्याची माहिती आहे.
या राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.