कोल्हापूर प्रतिनिधी, डॉल्बी साईन सिस्टिम आणि डिजिटल बोर्ड लावण्यावरून वाद – पोलीस नियंत्रण -तणावपूर्ण शांतता
कोल्हापूर – नुकत्याच सुरू झालेल्या सर्किट बेंच मागील बाजूस असलेल्या सिद्धार्थ नगर चौकात शुक्रवारी रात्री उशिरा डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि डिजिटल बोर्ड लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत चार युवक आणि तीन पोलीस जखमी झाले असून एक वाहन पेटवण्यात आले तसेच पाच वाहनांची मोडतोड करण्यात आली.
स्थानिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठी साऊंड सिस्टीम लावल्याने सिद्धार्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला होता. यासोबतच परवानगी न घेता मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. यावर दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सायलेंट झोनची अंमलबजावणी करत दुपारच्या वेळी साऊंड सिस्टीम काढून टाकण्यास भाग पाडले होते. मात्र सायंकाळी पुन्हा मोठे डिजिटल बोर्ड लावून, साऊंड सिस्टीम सुरू करून आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच हाणामारी भडकली.
घटनेची गंभीरता ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्यासह लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजवाडा पोलीस स्थानक तसेच राखीव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून दोन्ही जमावाला शांत केले व त्यांना पांगावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून दोन पोलीस गाड्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून सकाळपासूनच या घटनेची चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.