कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण कोल्हापूर जिल्ह्यातील १९ हजार ५४ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ७० लाख ३५ हजार युनिट वीज निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्वात ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महाविरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.
एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येते. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना पहिल्या दोन किलोवॅटसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.
योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन व सुलभ – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
पीएम – सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसविणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.
———————जाहिरात—————–