कोल्हापूर | प्रतिनिधी “रेडिओ हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे,” असे मत रेडिओ ऑरेंज, सांगलीचे प्रमुख यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभाग आणि वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात ‘रेडिओ ब्रॉडकास्टिंग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत रेडिओ क्षेत्रातील तीन अनुभवी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.🔹 यशवंत कुलकर्णी यांनी ‘रेडिओ प्रोग्राम’ या विषयावर सखोल माहिती देताना सांगितले की, “रेडिओ हे दर्जेदार कार्यक्रमांद्वारे समाजमनावर खोलवर प्रभाव टाकू शकते. श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ टिकणारे कार्यक्रम निर्मिती करणे ही खरी ताकद आहे.”
🔹 ‘आपलं एफएम’चे लोकप्रिय आरजे शरद खोबरे यांनी “रेडिओ स्क्रिप्ट आणि अँकऱिंग” या विषयावर मार्गदर्शन केले. आवाज, शब्द आणि भावना यांचा योग्य समन्वय साधण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. तसेच अँकऱिंगचे थेट प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला.🔹 आकाशवाणी कोल्हापूरचे निवृत्त प्रतिनिधी रवींद्र कुलकर्णी यांनी “सोशल मीडियाच्या युगातही आकाशवाणी केंद्राची विश्वासार्हता टिकून आहे. आजही अनेक लोकं विश्वासाने आकाशवाणीवरील बातम्या व कार्यक्रम ऐकतात,” असे सांगितले.
उद्घाटनप्रसंगी पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “विद्यापीठीन काळात अशा कार्यशाळांद्वारे व्यावसायिक अनुभव घेणे ही काळाची गरज आहे. या कार्यशाळा म्हणजे करिअरच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”या कार्यशाळेस प्रा. डॉ. शिवाजी जाधव, शैलेश कोरे, विवेक पोर्लेकर, सुधाकर बर्गे यांच्यासह विद्यापीठ व वारणा महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार तेजश्री शिंदे यांनी मानले.
=============जाहिरात============