मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने दिनांक 23 मे 2019 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येत आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणार आहेत. यावेळी मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसच्या मुख्य गेटसमोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणारा व जाणारा रस्ता या मार्गावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड, महानगरपालिकेची वाहने व इतर शासकीय वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना दिनांक 23 मे 2019 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
मनाई कालावधीमधील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे : समतानगरकडून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – मिरज रेल्वे स्टेशन, मिशन हॉस्पिटल ते सांगलीकडे (परतीचा मार्ग तोच). कृपामाई ब्रिजकडून समतानगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी – मिशन हॉस्पिटल मार्गे मिरज शहर (परतीचा मार्ग तोच राहील).
- पार्किंगची व्यवस्था – मारूती मंदिर ते सूतगिरणीकडे जाणाऱ्या रोडच्या उत्तरेस – भूमापन क्र. 926 (दुचाकी व चारचाकी). शेठ रतिलाल गोसलिया डी. एड्. कॉलेजच्या पूर्व बाजूचे मोकळे मैदान – भूमापन क्र. 878 (चारचाकी). सुखसमृध्दी अपार्टमेंटच्या पूर्व व पश्चिम बाजूचे मोकळे मैदान – भूमापन क्र. 919 (दुचाकी). या जागा दिनांक 23 मे 2019 रोजी 05.00 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पार्किंगसाठी अधिगृहित करण्यात आल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.