कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात होणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रविवार २६ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० ते १० या वेळेत दसरा चौकात समता दिंडी आयोजित करण्यात आली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
ही समता दिंडीची सुरुवात दसरा चौकात होवून पुढे -व्हिनस कॉर्नर- माई महाराजांचा पुतळा- बिंदू चौक-भवानी मंडप -छत्रपती शिवाजी महाराज चौक- छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय समोरुन -दसरा चौक येथे या दिंडीचा समारोप होणार आहे. या दिवशी दसरा चौकात सकाळी ७.३० ते ८.३०वाजता शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम असून यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर 8.30 वाजता दसरा चौक येथे पालकमंत्री सतेज पाटील व श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होवून समता दिंडीस सुरुवात होणार आहे.
या समता दिंडीमध्ये विद्यार्थी मैदानी खेळ, लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशा सोबत उपस्थित राहणार असून एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देख्याव्यासह तयार करण्यात आलेला चित्ररथ तसेच जिल्ह्याचे वेगळेपण असलेल्या सजवलेल्या रिक्षाही या दिंडीमध्ये असणार आहेत. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो व इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन यावेळी या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. या दिंडीचे नियोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयाद्वारे करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी समता दिंडीमध्ये सहभाग नोंदवून राजर्षी शाहू महाराजांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.