मुंबई: शिवसेनेविरुद्ध बंड केलेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेला या आमदारांवर अपात्रतेची कारवाई कधी होणार, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सुनावणीवर विद्यमान शिंदे गट-भाजप युती सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणीच आता लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाला विनंती करणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश एऩ व्ही़ रमण यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाचा सुनावणीसाठी समावेश नाही. या याचिका अन्य कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. आता ही सुनावणी मंगळवारी किंवा बुधवारी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे