कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यावसायिकांनी त्यांचा गल्ला सोडला तरच व्यवसायात वाढ होईल, असे मत जीजेसीचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने येथील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये लाभम या अंतर्गत सराफ व्यावसायिकांसाठी चर्चासत्र झाले. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल यांनी जॉबवर्क, जीएसटी व हॉलमार्क या विषयावर बोलताना सांगितले की, व्यवसाय करावयाच्या पद्धतीत बदल करण्याबरोबरच मानसिकता बदला. कायद्याची चौकट न मोडता व्यवसाय करा. पळवाट शोधू नका. ज्यामुळे आपणलाच शांतता लाभेल.
जीजेसीचे संचालक राजेश रोकडे यांनी जीजेसीबरोबरच लाभमविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्ले) येथे जीजेसीच्या वतीने २२ ते २५ सप्टेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला भेट देऊन दागिन्यांतील विविधता अनुभवता येईल. त्याचबरोबर संघटित होण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य जरुरी आहे. कारण आपला व्यवसाय हा ७० संघटित आहे, तर ३० संघटित आहे. संघटित शक्तीच्या जोरावरच आपली व्यवसाय वृद्धी आहे.
कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, सराफ व्यावसायिकांच्या युवा पिढीने शासकीय तंत्रनिकेतन येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या ज्वेलरी डिप्लोमासाठी प्रवेश घेऊन आपल्या पारंपरिक व्यवसायाला नवतंत्रज्ञानाची जोड द्यावी.