कोल्हापूर – प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन पुढील काळात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
सर्किट हाऊस येथील सभागृहात आयोजित कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार राजेंद्र यड्रावकर, मित्रा चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे ॲड. बाबा इंदुलकर, आर. के. पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबत नागरिक व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. तसेच कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडूनही हद्दवाढीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून हद्दवाढ बाबत सकारात्मक उपाय काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, यासाठी पुन्हा स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. बाबा इंदुलकर, आर.के. पवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी हद्दवाड बाबत सविस्तर माहिती पालकमंत्री महोदयांना देऊन कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर पाठपुरावा करुन घ्यावा, अशी मागणी केली.
जिल्ह्यात डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर निधी १०० टक्के खर्च करावा
जिल्ह्यातील दहा डोंगरी गटात डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेला वीस कोटीचा निधी विविध विकास कामावर १०० टक्के खर्च करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात डोंगरी विकास विभाग कार्यक्रम सन २०२२-२३अंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व डोंगरी गटात येणाऱ्या गावांमध्ये विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करावेत. प्रत्येक गटाला मंजूर असलेल्या दोन कोटी निधीतून ही कामे मंजूर करावेत. या भागात सर्व शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी जिल्ह्यातील दहा डोंगरी गटांसाठी डोंगरी विकास विभाग कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत वीस कोटीचा निधी मंजूर असून यातील प्रत्येक गटाला दोन कोटी निधी उपलब्ध होणार असून त्या अनुषंगाने विकास कामाचे प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती दिली.