Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापुर : सध्याचे युग हे समाज माध्यमाचे आहे . मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमा पेक्षा डिजिटल माध्यम गतिशीलतेमध्ये दोन पावले पुढे आहेत. त्यामुळेच जाहिरात विश्वातील वार्षिक सत्तर हजार कोटीच्या ऊलाढालित डिजिटल माध्यमाचा वाटा सत्तावीस हजार कोटी रूपयांचा आहे . त्यामुळे इतर माध्यमानी डिजिटल माध्यमाला सवतीच्या पोराची वागणूक न देता सलोखा जपावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यानी कोल्हापुरात बोलताना केले .
कोल्हापुर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक- पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिन आणि पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सोहळा शाहू स्मारक भवनात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजा माने बोलत होते. यावेळी बोलताना माने यानी येणारा काळ डिजिटल मिडियाचा असल्याचे भाष्य केले .इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमानी डिजिटल मिडियाला सोबत घेऊन वाटचाल करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले . दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माने यांच्या हस्ते झाले . मुक्त पत्रकार राजा मकोटे यानी संपादित केलेल्या आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर याना जीवन सन्मान पुरस्कार देऊन त्याना सन्मानित करण्यात आले. लाइव्ह चोवीस तास न्यूज नेटवर्कचे विशेष प्रतिनिधी नवाब शेख याना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार तर मीडिया कंट्रोलचे सहसंपादक अजय शिंगे याना उत्कृष्ठ पत्रकार, नाजीम आत्तार याना उत्कृष्ठ छायाचित्रकार ,लाइव्ह मराठी चे नरेंद्र देसाई याना उत्कृष्ठ व्हिडिओ एडिटर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबददल डॉ रेशमा पवार , सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे तर उद्योग क्षेत्रातील सेवेबददल अंकुश सर्वगोड़े याना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील यानी केले. प्रस्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे यानी केले. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर यानी आपले मनोगत व्यक्त केले .जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके यानी आभार मानले.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील ,शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारीता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ रत्नाकर पंडित, श्री देवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम, ज्येष्ठ मुस्लिम मराठी साहित्यिक आय जी शेख,लाइव्ह चोवीस तास न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक समाधान महातुगड़े माजी महापौर सुनील कदम, निवृत्त पोलीस उप अधीक्षक पंढरीनाथ मांडरे, शाहू छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक जावेदभाई मुल्ला, ज्येष्ठ चित्रकार हारूण पी सरदार, शाहुकालींन वस्तुंचे संग्राहक झाकिर पठाण, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अझम जमादार, शाहरुख गढ़वाले , छाया सालुंखे, लाइव्ह चोवीस तास न्यूजचे विशेष प्रतिनिधी इन्द्रजीत मराठे उपस्थित होते