(अजय शिंगे)कोल्हापूर – राज्यात झालेला राजकीय भूकंप सर्वांसाठी धक्कादायक होता कारण कोणाच्या ध्यानी मनी नसताना झालेला शपथविधी सोहळा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली मोठी फूट जनतेच्या मनात शंका निर्माण करणारीच आहे. भूकंप झाला.! आमदार गेले.! मंत्री झाले.!
आता पुढे काय ….?
आता पुन्हा राज्यात तीच परिस्थीती येणार काय पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं बहुमत कोणाचे, अध्यक्ष कोण , पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात जाणार का? जनेतला पडेलेला मोठा प्रश्न.. कालच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पाहिले असेल कोणी मतदान कार्ड जाळत होते, कोणी मतदान कार्ड विकायचं आहे म्हणत होते ! थोडे गमतीशीर वाटले असेल पण खरच सामान्य जाणता आता अक्षरशः वैतागली आहे. राजकारण इतके खालच्या पातळीवर पोहचले आहे इथे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इथून तिकडे उड्या मारल्या जात आहेत, विकासाच्या नावावर चाललेले राजकारण आता खूप दिवस नाही टिकणार अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.
राजकीय भूकंपाचे सर्वात जास्त पडसाद सध्याचा विचार करता कोल्हापुर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या लोकसभा विधानसभा महापालिका जिल्हापरिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. गेले कित्येक महिने इथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती या मध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे आ.सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे ना.हसन मुश्रीफ हेच जिल्ह्याचे गेमचेंजर ठरले आहेत. गेल्या काही वर्षात या दोन प्रमुख नेत्यांनी लोकसभा विधानसभा महापालिका मध्ये एकत्रित राहून मोठे बदल घडवून आणले तसेच गोकुळ मध्ये देखील सत्तांतर घडवून आणले. परंतु हसन मुश्रीफ भाजप सोबत गेल्याने आता जिल्ह्याचे संपूर्ण समीकरण बदलून गेले आहे. लोकसभे साठी आता संजय मंडलिक- धनंजय महाडिक – धैर्यशील माने – हसन मुश्रीफ अशी मोठी ताकद लागणार त्यामध्ये काहीच शंका नाही. यामुळे सतेज पाटील हे कुठे तरी एकटे पडले आहेत असे चित्र सध्या तरी तयार झाले आहे. हसन मुश्रीफ यांच्या निर्णयाने आता भाजप गटात कुठेतरी नाराजी झाली असावी अशी चर्चा सुरू आहे. कारण गेली सात वर्षे कागलच्या राजकारणात समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या मध्ये संघर्ष सुरू आहे. परंतु अचानक हसन मुश्रीफ हे भाजप सोबत गेल्याने आता दोघांना हा संघर्ष बाजूला ठेऊन एकत्र संसार करावा लागणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. आता मुश्रीफ यांना मंडलिकांचा प्रचार करावा लागणार त्यामुळे संजयबाबा घाटगे यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. चंडगड मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे संजय घाटगे शिवाजी पाटील आणि समरजित घाटगे यांना मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागणार या मध्ये काहीच शंका नाही.
हसन मुश्रीफ यांच्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण कोणती दिशा घेणार हे पाहणं खूपच महत्वाचे ठरणार आहे. आजपर्यंत कोल्हापूर मध्ये गटाचे महत्त्व नेहमीच जास्त राहिले आहे. तसे झाल्यास आ.सतेज पाटील आणि ना.हसन मुश्रीफ हे एकत्रच दिसतील परंतु पक्षा कडून आदेश आल्यास हसन मुश्रीफ यांना सतेज पाटील यांच्या विरोधात उभ राहावं लागेल. आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला सर्वात जास्त बळ कोल्हापुर ने दिले आहे. एकेकाळी सदाशिवराव मंडलिक, निवेदिता माने,के.पी.पाटील, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील, दिग्विजय खानविलकर असे भक्कम नेतृत्व या पक्षात कोल्हापूरचे होते. परंतु अचानक झालेलं बदल आणि पुढे येणाऱ्या समस्या यांचा विचार करता शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादी मध्ये देखिल दोन गट होणार आणि पुनः एकदा एक वेगळा संघर्ष पहायला मिळणार. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनी घेतलेला निर्णय कागल मधील मतदार कितपत स्वीकार करतात हे येणारा काळच ठरवेल. ज्यांना गद्दार गद्दार म्हणत एकवर्ष ज्यांच्या विरोधात लढले आज त्यांच्यासोबतच जाऊन बसले त्यामूळे येणाऱ्या काळात समाराजित घाटगे आणि ना.हसन मुश्रीफ हे एकत्र येऊन काम करताना दिसतील हे मात्र नक्की . दोन गट पडले तर मग राष्ट्रवादी साठी उमेदवार कोण? विधानसभा लोकसभा निवडणुकीत कोण येणार आमने सामने याची जनतेला वाट पहावी लागेल. 7 वर्ष विरोध करून आता एकत्र येऊन काम करतीलच काय ? या मध्ये त्यांच्या राजकिय भवितव्याचा प्रश्न देखिल उपस्थीत झाला आहे.
जर हा पेच सुटला नाही तर येणाऱ्या काळात सतेज पाटील विरुद्ध हसन मुश्रीफ हे चित्र 100% कोल्हापूरकरांना अनुभवयाला मिळणार. या मध्ये कोणाचा फायदा कोणाचे नुकसान हे मतदारच ठरवतील अजून जिल्ह्यातील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी देखील आता चित्र स्पष्ट आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात आता मोठी राजकिय ताकद तयार झालेली आहे.
परंतु स्वबळावर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची ताकद देखील आमदार सतेज पाटील यांच्या मध्ये आहे असे मत कोल्हापूरची जनता व्यक्त करत आहेत. आपली नैतिकता आजवर त्यांनी कायम ठेवली आहे त्यामूळे जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसला मोठी उभारी मिळवून दिलेली आहे. मतदासंघातील चर्चेतून स्पष्ट दिसत आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारण्याची दाट शक्यता आहे.कोल्हापूरात निष्ठा आणि नैतिकता या गोष्टींना जास्त महत्व आहे त्यामुळे आधी शिंदे गट यांच्या बंडामुळे कोल्हापूरची जनता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर खूप जास्त प्रमाणात नाराज असलेले आपण वर्षभर पहिलेच आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे हेच चित्र तयार झाल्यास ना.हसन मुश्रीफ यांना देखील मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.
राजकारण हे नैतिकता आणि निष्ठा यावर अवलंबून असते परंतु आजचे चित्र पाहता इथे फक्त स्वार्थ संधीसाधूपणा आणि स्वतःच्या फायद्याचा विचार हेच जास्त दिसत आहे लोकशाहीची तत्वे मोडून सत्तेच्या मोहसाठी माणसं कोणत्या स्तरावर जातात हे महाराष्ट्रातील जनतेने गेले वर्षी भर पाहिले आहे. वर्षभर एकमेकांना शिव्या देणारे एकमेकांवर दात ओठ खाऊन तुटून पडणारे रविवारी एकमेकांच्या हातात हात घालून हसताना दिसत होते. जनतेने नेमके कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे हे आता स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या भीतीने विकासाचे कारण देऊन काही लोक एक पक्ष सोडून दुसरीकडे जात आहेत. यामध्ये जनतेचा काय फायदा जनतेचा काय विकास, यांच्या मागे लागलेली यंत्रणा थांबली, यामध्ये जनतेला काय मिळाले, महागाई वाढली आहे रोजगार मिळत नाही आहेत बेरोजगारी वाढत आहे. यांचे पक्ष बदलतच राहतील यामधून जनतेचे प्रश्न सुटणार कधी अशा चर्चा जास्त प्रमाणात नागरिकांमध्ये सूरू आहेत….!
भाग -1
(टिप : आपले मत नक्की कळवा)
भाग – 2 लवकरच…..