रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी हे त्यांनी स्थापित केलेले दक्षिण आणि बॉलीवूड चित्रपटांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. ही फिल्मसिटी शेकडो एकरांमध्ये पसरलेली असून येथे आतापर्यंत हजारो चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
ते दीर्घकाळापासून आजारी होते. हैद्राबादातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली .रामोजी राव यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी रामोजी फिल्मसिटी येथे ठेवण्यात येणार आहे. रामोजी फिल्म सिटी हैदराबादची स्थापना 1996 मध्ये रामोजी राव यांनी केली होती, त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी झाला होता. रामोजी फिल्म सिटी हा जगातील सर्वात मोठा फिल्म शूटिंग स्टुडिओ मानला जातो. हे भारताच्या तेलंगणा राज्यात आहे. हा स्टुडिओ एकूण 1666 एकर परिसरात पसरलेला आहे.रामोजी स्टुडिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी 15 ते 25 चित्रपटांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. येथे एकूण 50 शूटिंग फ्लोअर्स आहेत. आतापर्यंत या स्टुडिओमध्ये एकूण 25000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.