कोल्हापूर : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्याकडून काल, शुक्रवारी रात्री अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. विधानसभेच्या अनुषंगाने माजी आमदार के. पी. पाटील यांनी काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांचे गारगोटीत मोठे स्वागत केले होते. त्यानंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी दारात आल्याने या कारवाईला राजकीय काय डाव आहे का याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात कालपासून सुरु झाली आहे.
बिद्री कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. सुरवातीपासूनच १३० कोटी रुपयांचा हा प्रकल्प सत्ताधारी व विरोधी गटाच्या आरोपांनी चर्चेत आहे. प्रकल्पाचे इरादापत्र, अन्य परवानग्या व कर्ज यांमुळे नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणूकीतही हा मुद्दा गाजला होता. या निवडणूकीत के. पी. पाटील यांनी एकहाती सत्ता कायम राखत विरोधकांना चारीमुंड्या चित केले होते.प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करून अहवाल वरती पाठवण्यात आला आहे. येणाऱ्या निवडणुकीत के पी पाटील यांची आमदारकी नक्की मानली जात आहे त्यामुळे हा एक राजकीय डावपेच असू शकतो अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे