शिक्षकांच्या प्रश्नांवर थेट संवाद; शाळा-महाविद्यालयांच्या भेटींमुळे प्रचाराला गती
कुर्डूवाडी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचाराला राजकीय बळ मिळाले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले, अभ्यासू आणि युवा नेतृत्व विधान परिषदेत पोहोचावे, अशी भूमिका या प्रचाराच्या निमित्ताने पुढे येत आहे.
कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने कुर्डूवाडी आणि माढा परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे. या भेटींदरम्यान शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न, प्रलंबित मागण्या, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे प्रचाराला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता शिक्षकांच्या समस्या समजून घेण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका अधोरेखित होत आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा
कुर्डूवाडी परिसरातील जिव्हाळा सुसंस्कार मंदिर, आंतरभारती विद्यालय, नूतन विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, महात्मा ज्योतिबा फुले ज्युनिअर कॉलेज, आदर्श पब्लिक स्कूल, डॉ. नेताजी करळे पब्लिक स्कूल तसेच भोसरी येथील विनायकराव पाटील हायस्कूल आदी शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात आल्या. या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक कार्याची, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेची आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याच्या निर्धाराची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार, जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, प्राध्यापकांच्या मानधनवाढीची मागणी, सेवासुरक्षा आणि विविध प्रलंबित प्रश्न हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, त्यांच्या सेवाविषयक प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि न्याय्य मागण्यांना शासनस्तरावर प्रभावीपणे वाचा फोडली जावी, अशी अपेक्षा शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांची विधान परिषदेत ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचा मुद्दा गावडे यांच्या प्रचारातून पुढे आणला जात आहे. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर धोरणात्मक उपाययोजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे.
युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन
प्रचार दौऱ्यादरम्यान शिक्षकांशी झालेल्या संवादातून उत्साहाचे वातावरण दिसून आल्याचे प्रचारकांकडून सांगण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांशी थेट नाते असलेल्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन करण्यात येत असून, काही शिक्षकांनी गावडे यांना प्रथम पसंती देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे कुर्डूवाडी-माढा परिसरात त्यांच्या उमेदवारीची चर्चा वाढत आहे.
या प्रचार उपक्रमात सोलापूर जिल्हा निवडणूक प्रचारप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील, मुख्याध्यापक दिलावर मुलानी, सुनीलतात्या नलवडे, मुख्याध्यापक मल्लाव सर, तालुकाप्रमुख संजय कोयले, प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. प्राची जगताप, प्रा. करण पाटील, प्रा. मालोजी पवार, प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर आणि आकाश गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याच्या मुद्द्यांवर भर देत कुर्डूवाडी-माढा परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीत शिक्षकांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे आता शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


