जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करुन जलप्रदूषण रोखण्याची गरज –
डॉ. जे. के. पवार

0 0

Share Now

Read Time:8 Minute, 31 Second

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जलनीतीचे धोरण राबवत राधानगरी धरणाची उभारणी, विहिरी, तलावांची निर्मिती व दुरुस्ती, गाळ काढण्याची कामे मोठ्या संख्येने केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जलनीतीचा विचार अंगिकारुन जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शाहू अभ्यासक डॉ. जे. के. पवार यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राधानगरी येथे “राजर्षी शाहू आणि सिंचन” या विषयावर परिसंवाद घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते, यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर, तहसिलदार अनिता देशमुख, जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उप अभियंता प्रवीण पारकर, राधानगरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रशेखर कांबळे, सरुड महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश नाईक, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, सोन्याची शिरोलीतील प्राथमिक विद्यामंदिरचे हर्षल जाधव तसेच शाहूप्रेमी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. जे.के. पवार म्हणाले, शाहू महाराजांच्या अवघ्या 48 वयाच्या जीवनात त्यांना एका मागून एक आलेल्या अनेक संकटांना सामोरे जावे लागले, पण या संकटांना न डगमगता त्यावर मात करुन त्यांनी लोककल्याणासाठी अविरत कष्ट सोसले. जीवनात आलेल्या अनेक संकटांच्या विषाचे प्राशन स्वतः करुन समाजाला मात्र अमृत वाटण्याचे काम त्यांनी केले. संकटांवर मात करुन त्यांनी सामाजिक क्षेत्राबरोबरच आर्थिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. हस्तक्षेपाचे आणि निरहस्तक्षेपाचे अशा दोन धोरणांपैकी शाहू महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी जाणीवपूर्वक हस्तक्षेपाचे राजकारण स्वीकारले होते. शेती, व्यापार, उद्योगाशिवाय प्रगती नाही, हे जाणून त्यांनी या क्षेत्रात भरीव योगदान दिले. याच विचारांनी त्यांनी शेती विकासावर भर दिला. श्रममूल्य सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांच्या विचारांशी त्यांचे विचार मिळते जुळते असल्याचे दाखले पवार यांनी दिले.

उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे म्हणाले, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, कृषी अशा सर्वच क्षेत्रात शाहू महाराजांनी भरीव कार्य केले. आंतरजातीय विवाह, अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, बाजारपेठ निर्मिती, मागासवर्गीयांना नोकऱ्यात आरक्षण असे अनेक निर्णय आणि कायदे करुन त्यांनी सामाजिक हित जोपासले. शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण वाटचाल करुया असे आवाहन त्यांनी केले.

हरितक्रांतीचे प्रणेते, सर्व जाती धर्मातील व्यक्तींना समानतेची वागणूक मिळावी यासाठी कृतीशील, माती आणि पाण्याचे महत्व ओळखून त्यामध्ये पैसा गुंतवणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय, अशा शब्दात डॉ.चंद्रशेखर कांबळे यांनी शाहू महाराजांचे महती विशद केली. शाहू महाराजांनी केव्हा धरण बांधले नाहीत तर माणसांना बांधण्याचे, जोडण्याचे काम त्यांनी केलं. समतेचा विचार त्यांनी कृतीतून समाजात रुजवला. शाहू महाराजांचे विचार डोळ्यासमोर ठेवून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसेवेचे व्रत अंगिकारावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवाजीराव चव्हाण म्हणाले, शाहू महाराजांनी शाहूपुरी व्यापार पेठेची निर्मिती, उद्योगधंद्यांना पाठबळ, शेती उत्पादन वाढीला चालना दिली. तसेच सामाजिक, आर्थिक, सहकार क्षेत्राची वृद्धी केली. उद्योगधंद्यांना पाठबळ, कारखानदारी उभारुन उद्योग, सहकार, कृषी क्षेत्राचा विकास साधल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश नाईक म्हणाले, शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेले कार्य मोलाचे आहे. गंगाराम कांबळे याला चहाचे हॉटेल सुरु करून देऊन त्या काळात क्रांतिकारी बदल घडवला. जलनीतीचे स्वतंत्र धोरण त्यांनी राबवल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी कार्य केले. राधानगरी धरण बांधण्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शामियाना उभा केला आणि या मुलांच्या न्याहारीची व्यवस्था नव्या राजवाड्यातून केली होती. शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे. ऐतिहासिक राधानगरी येथे या धरणाशी संबंधित शाहू महाराजांच्या आठवणींवर आधारित आठवणींचा ठेवा या ठिकाणी चित्र, शिल्प, दस्तावेज स्वरुपात जतन करणे गरजेचे आहे, असे सांगून राधानगरी मध्ये राज्य व देशातील अभियंत्यांची परिषद होण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले.

कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी शाहू महाराजांच्या जलसंपदा क्षेत्रातील कार्याची माहिती देऊन त्यांच्या जलनिधीचे धोरण विशद केले.

हर्षल जाधव यांनी शाहू महाराज आणि संविधान या विषयी मार्गदर्शन केले.
राधानगरी विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया बबन कांबळे हिने मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांचा जीवनपट अस्खलित भाषणातून डोळ्यासमोर उभा केला. बहुआयामी, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या शाहू महाराजांचे विचार भावी पिढीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे तिने सांगितले.

प्रास्ताविक व स्वागत राधानगरी धरणाचे उपअभियंता प्रविण पारकर यांनी केले तर शाखाधिकारी समीर निरुखे यांनी आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *