सांगली : आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, नेमिनाथनगर सांगली, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांनी मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देवून अपघातापासून स्वतःचे व कुटुंबांचे संरक्षण करावे असे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी वाहन परवाना काढला नाही त्यांनी तात्काळ आजच तो काढण्याची सुरूवात करावी. कायद्याची सुरवात ही स्वतः आपल्या घरातून केली पाहिजे. कायदा हा घरातूनच पहिल्यांदा अंमलात आणला पाहिजे, त्यामुळे आपली व समाजाची तसेच राष्ट्राची प्रगती होईल व राष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामाबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. अमोल डोंबे यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी मार्गदर्शन केले. कायदा हा सर्वत्र आहे, कायद्याची माहिती असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून 1 जुलै 2024 पासून नव्याने लागू झालेल्या कायद्याची माहिती दिली. प्रत्येकाने कायदा हा पाळलाच पाहिजे त्यामुळे आपली, समाजाची व राष्ट्राची प्रगती निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रियांका मजलेकर यांनी केले. आभार कोमल पवार यांनी मानले. या शिबिराचे नियोजन महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. एस.ए. तांबोळी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी बहुसंख्यने उपस्थित होते