पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची महाविकास आघाडीची रणनीती
हर्षदा देशमुख-जाधव यांना माझे शंभर टक्के सहकार्य — सतेज पाटील

पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची महाविकास आघाडीची रणनीती

कोल्हापूर प्रतिनिधी. ११ : पदवीधरांचे बेरोजगारीचे प्रश्न, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, पेपरफुटीचे प्रकार आणि जुन्या पेन्शनचा प्रश्न या मुद्द्यांवरून राज्य व केंद्र सरकारला लक्ष्य करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापुरातून राजकीय रणशिंग फुंकले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही केवळ दोन उमेदवारांच्या विजयापुरती मर्यादित नसून, शिक्षणव्यवस्था, तरुणांचे भविष्य आणि शिक्षकांच्या हक्कांशी निगडित असल्याची भूमिका नेत्यांनी मांडली. कोल्हापुरातील मेळाव्यात सरकारच्या कारभारावर टीका करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विविध प्रश्नांवरून सरकारच्या धोरणांवर टीका केली. शिक्षण क्षेत्रातील समस्या, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका या मुद्द्यांवर भाषणे झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार हे सुजाण व विचारपूर्वक मतदान करणारे आहेत. जयंत आसगावकर यांनी आमदार म्हणून काम करताना शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले असून, त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. हर्षदा देशमुख-जाधव या उच्चशिक्षित असून, पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार आहेत. पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे तरुणांच्या भविष्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेत पाठविण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या कामाचा आढावा घेतला. जयंत आसगावकर यांनी आमदारकीच्या काळात आपला शंभर टक्के निधी शिक्षण आणि शाळांसाठी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरातून निघालेल्या मोर्चाने आंदोलनाला व्यापक स्वरूप दिल्याचे नमूद करत त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य केले. तरुणांच्या अपेक्षा समजून घेणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव या सक्षम उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. देशातील हुकूमशाही प्रवृत्तींना रोखण्यासाठी पुरोगामी विचारांची परंपरा असलेल्या कोल्हापुरातूनच परिवर्तनाची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएमबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंकांचाही त्यांनी उल्लेख केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. संस्कृती आणि मूल्यांची शिकवण देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महिलांशी गैरवर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. ही निवडणूक परिवर्तनाच्या विचारांची असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन्ही उमेदवार अभ्यासू आणि सक्षम असल्याचे सांगितले. गोकुळसह पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती, शिक्षण आणि तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीने या निवडणुकांना महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी कोल्हापूरच्या भूमीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा असल्याचे सांगितले. आज पदवीधरांसमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, तर शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध कामांचा भार सहन करावा लागत आहे. तरुणांना स्थैर्य, पारदर्शकता आणि समान संधी मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत आसगावकर यांनी शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांसाठी यापुढेही सातत्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. शिक्षकांचे हक्क, शिक्षणव्यवस्थेतील अडचणी आणि पदवीधरांचे प्रश्न यांसाठी आपला लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यास माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज पाटील, राजू लाटकर, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, विजय नाडकर, प्रभाकर देशमुख, राजू आवळे, शिवाजी खांडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

============जाहिरात=============

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *