सीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर, दि. १२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) न्यूरोसर्जरी विभागाने दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. रुग्णालयात प्रथमच अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
यामध्ये नाकाच्या मार्गाने पिट्युटरी ट्युमर काढण्याची आधुनिक एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, तसेच मेंदू व कवटीच्या तळाजवळ विस्तारलेला फंगल बॉल सुरक्षितपणे काढण्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना मोठ्या खासगी रुग्णालयांऐवजी शासकीय रुग्णालयातही अत्याधुनिक उपचार मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. तेजस कामत यांनी कान, नाक व घसाशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वासंती पाटील यांच्या सहकार्याने या शस्त्रक्रिया केल्या. या यशामध्ये अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने यांच्यासह विविध विभागांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन डॉक्टर व सीपीआर प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या यशामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल उपचार शासकीय रुग्णालयात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
============= जाहिरात============

