कोल्हापूर प्रतिनिधी, सदर बाजार येथील पंचशील भवन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेले या कामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झालेले, परंतु लायब्ररीच्या बांधकाम व डागडुजीमध्येच हा निधी संपल्याने तेथे संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर हे साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे आप पदाधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीत उघड झाले.
या परिसरातील अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांकरिता असलेल्या डिजिटल लायब्ररी मध्ये संगणकच नसेल त्याला डिजिटल कसे म्हणता येईल असा सवाल आप चे शहर महासचिव अभिजीत कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला.
यावर उपशहर अभियंता निवास पोवार यांनी अपूर्ण कामे प्राधान्याने करून घेऊ, संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर ही कामे पूर्ण करून लवकरच ही लायब्ररी सुरु करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, शहराध्यक्ष उत्तम पाटील, समीर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, स्वप्नील काळे, लखन मोहिते आदी उपस्थित होते.
————————-जाहिरात——————————-