कोल्हापूर, दि. ११ : जिल्ह्यातील खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी, एफ.एफ.रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या तक्रारी या तक्रार कक्षात नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राज्यात खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर सनियंत्रणासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट १९९५ नुसार व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे पार पडली. यावेळी पोलीस विभागाचे प्रतिनिधी, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, एफएम रेडिओ, टीव्ही तसेच कम्युनिटी रेडिओ बाबत प्रसारणाचे कायदे, नियम आहेत. त्याचे पालन होत नसल्यास किंवा नागरिकांनी अनुषंगिक तक्रारी केल्यास त्याबाबत त्वरित कार्यवाही करावी. केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेला याबाबत कळवावे.
बैठकीत समितीच्या कार्यपध्दतीबाबत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी माहिती दिली. खाजगी दूरचित्रवाणी, एफ.एम. आणि रेडिओ बाबत कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, प्रसारीत मजकुराबाबत समिती सदस्यांना असलेले आक्षेप, डिजीटल एन्क्रिप्टेड सिग्नल प्रसारण याबाबत त्यांनी माहिती दिली.
बैठकीत स्वागत जिल्हा माहिती अधिकारी श्री. अडसूळ यांनी तर आभार माहिती अधिकारी श्रीमती पाटील यांनी मानले.
खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी आणि एफ. एम. रेडिओ सनियंत्रण समिती मार्फत जिल्हा तक्रार कक्ष जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, कसबा बावडा रोड, कोल्हापूर पिन 416003 येथे कार्यरत आहे. या ठिकाणी नागरिकांनी प्रसारणाबाबत प्रसारण संहितेचे पालन होत नसल्याने कोणतीही तक्रार असल्यास लेखी द्यावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले आहे.
प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक संदेशाचे प्रसारण करण्याचे आवाहन
जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणारे आवाहन तसेच जनजागृती पर महत्वाचे संदेश, सूचना यांचे विनामूल्य प्रसारण सर्व केबल नेटवर्क, एफएम रेडिओ तसेच कम्युनिटी रेडिओ वरून करण्यात यावे. याबाबत जिल्हा करमणूक शाखेकडून विहित पद्धतीचा अवलंब करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.