कोल्हापूर दि २५ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार वृत्तपत्र, विद्या आणि जनसंवाद विभागात गुरुवार, दि. २५ रोजी हे अभियान उत्साहात पार पडले.
सकाळी ११ वाजता दूरदर्शनचे प्रतिनिधी चंद्रकांत कबाडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही तर जीवनशैली असावी. “स्वच्छ परिसर, स्वच्छ मन आणि स्वस्थ जीवन” हाच खरा संदेश आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कबाडे सरांनी विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन डेव्हलपमेंट आणि सॅनिटायझेशन यातील संबंध स्पष्ट करताना सांगितले की, प्रभावी संवाद फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो; त्यामागे शिस्त, जबाबदारी आणि स्वच्छतेची जाण असणेही महत्त्वाचे आहे. पत्रकारितेत काम करताना विद्यार्थ्यांनी केवळ बातमी गोळा करणे नव्हे, तर सामाजिक जबाबदारी समजून घेणे, सार्वजनिक जागांचे रक्षण करणे, आणि आपल्या कृतीत नैतिकता ठेवणे गरजेचे आहे. सरांनी त्यांच्या स्वच्छता अभियानातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडून दाखवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त माहितीच नव्हे तर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून सामाजिक बदल घडवण्याची प्रेरणा देखील मिळाली.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विभागाच्या आवारात स्वच्छता केली. वर्गखोली, कॉम्प्युटर लॅब, पुस्तकालय आणि परिसरातील कचरा गोळा करून तो व्यवस्थित ठिकाणी टाकण्यात आला. या उपक्रमाचे सुंदर नियोजन निशा पाटील यांनी केले, तर आभार विनोद पाटील यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे विभागाचा परिसर नीटनेटका व सुंदर दिसत होता, यामुळे स्वच्छतेविषयीची जागरूकतेत वाढ झाली.
कार्यक्रमात विभाग प्रमुख वरिष्ठ प्रा. डॉ. निशा पवार मुडे, प्रा. डॉ. शिवाजी जाधव, प्रा. विवेक पोर्लेकर यांच्यासह विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.