कोल्हापूर ता.२५ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या पंधरवड्यातर्गत कोल्हापूर शहरात ”एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७ ते ८ या वेळेत शहरातील सासने ग्राऊंड समोरील ताराबाई उद्यान, भगवा चौक परिसर, श्री अंबाबाई मंदिर परिसर, राजाराम बंधारा परिसर व बिंदू चौक पार्किंग येथे ही मोहिम पार पडली. हा उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार तसेच प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
श्री अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छता मोहिमेत प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी आपल्या परिवारासह सहभाग नोंदविला. या उपक्रमात शहरातील अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणी Cleanliness Target Unit (CTU) अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. एकूण पाच अस्वच्छ ठिकाणी ही मोहिम राबवून सुमारे ३५ टन प्लास्टिक, कचरा व तनकट गोळा करून झूम प्रकल्पाकडे प्रकियेसाठी पाठविण्यात आला.
या मोहिमेत उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, बावडा रेस्क्यू फोर्स, राजाराम बंधारा ग्रुपचे सदस्य, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, विकास भोसले, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, शुभांगी पवार, सुशांत कांबळे, अग्निशमन विभागाचे जवान, एसबीआय शाखेचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्वयंसेवी संस्था, तालिम मंडळे व नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळाला. येथून पुढेही नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
———————-जाहिरातत———————-