कागल प्रतिनिधी, दि. १: महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर परिषदांवर कागल विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदार संघांसह १६ पंचायत समिती मतदार संघांवर आणि पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आणि पर्यायाने महायुतीचा झेंडा फडकविण्याची शपथ घेऊया, असेही ती म्हणाले.
येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, पदवीधर मतदार संघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे. तो मोठा पक्षही आहे. त्यांनी आम्हा दोघा लहान भावांना सामावून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनीच जर आम्ही एवढ्या जागा घेणार आणि उरलेल्या त्यांना देणार, अशी भूमिका घेतली तर हे चालायचं कसं? असा सवालही त्यांनी केला.
मुश्रीफ पुढे म्हणाले, दोनच दिवसापूर्वी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आमची महायुती म्हणून बैठक झाली. त्यामध्ये श्री. पाटील यांच्यासह मी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे असे उपस्थित होतो. या बैठकीत काही चर्चा झाल्या आणि आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचेही ठरले. असे असतानासुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी काल पलूस येथे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी जाहीर केली, हे आश्चर्य जनक आहे. या संदर्भात त्यांना मी भेटेन. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका अजून सव्वा वर्षे पुढे आहेत. त्यांना सांगेन या संदर्भात त्या- त्या परिस्थितीत तिन्ही पक्ष बसून चर्चेने मेरिटवर निर्णय घेऊ.
मंत्री. मुश्रीफ म्हणाले, लवकरच आचारसंहिता सुरू होईल पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असा अंदाज आहे. या सगळ्या निवडणुकांमधील इच्छुकांच्या भूमिका मी मुलाखतीद्वारे प्रत्यक्ष जाणून घेईन. ज्येष्ठ नागरिकांसह तरुण, महिला आणि जनतेचीही मते आजमावीन आणि मग उमेदवा-या जाहीर होतील. इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करतानाच ते पुढे म्हणाले उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. उमेदवारी न मिळालेल्यांना कशा पद्धतीने मानसन्मान द्यायचा यासाठी मी विचार करेन. कारण, महायुती म्हणून आपण सरकारमध्ये सहभागी आहोत. मित्रपक्षांना सोबत घेऊनच ही निवडणूक लढवावी लागेल.
मुश्रीफ म्हणाले, माझ्यासारख्या सहावेळा आमदार झालेल्या आणि नऊवेळा मंत्री झालेल्या लोकप्रतिनिधीच्या विधानसभा मतदारसंघात या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. राज्यामध्ये नेत्यांसमोर उत्तर द्यायला कठीण जाते. आपल्या प्रतिष्ठेपेक्षा पक्ष संघटना आणि नेत्याची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे ही खूनगाठ बांधा.
शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये…….!
मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात म्हणाले, शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. तो आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाने राज्याची माजी मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. मंत्री म्हणून नव्हे तर केडीसीसी बँकेचा अध्यक्ष म्हणून याविषयी माझी ठोस भूमिका आहे. त्या समितीला माझी एवढीच विनंती आहे की, वारंवार थकबाकीमध्ये राहून कर्जमाफी घेणाऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही हे त्यांनी ठरवावे. दरम्यान; नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यादा कर्जासह जास्तीत जास्त सवलती मिळायला हव्यात. या समितीने अशी कर्जमाफी वारंवार करायची वेळच येऊ नये त्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊच नये, यासाठीही उपाययोजना सुचवाव्यात.
यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रकाश गाडेकर, सुखदेव येरुडकर, शशिकांत खोत, विश्वजीतसिंह पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब देसाई – मंनचेकर दिनकर कोतेकर, जे डी मुसळे, दत्ता पाटील – केनवडेकर, दिगंबर परीट, जीवनराव शिंदे, बाळासाहेब तुरंबे, राजेंद्र माने, रणजीत सूर्यवंशी, संजय चितारी, संजय फराकटे, सदानंद पाटील आदीप्रमुख उपस्थित होते स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी मानले.
============जाहिरात==========
