पत्रकार कल्याण योजनांची माहिती आता एका क्लिकइतकी सहज;
पत्रकार संवादिका'चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पत्रकार कल्याण योजनांचा लाभ आता अधिक सुलभ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’चे प्रकाशन

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिकाही प्रकाशित; माहितीअभावी एकही पात्र पत्रकार वंचित राहू नये, पालकमंत्र्यांची अपेक्षा

विशेष वृत्त:- शासनाच्या पत्रकार कल्याणकारी योजनांची अचूक, सुलभ आणि सर्वसमावेशक माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘पत्रकार संवादिका’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, शासन पत्रकारांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजना राबवत असले तरी आवश्यक माहिती, प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे अनेक पात्र पत्रकार या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ‘पत्रकार संवादिका’ ही पुस्तिका पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार असून, योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल. विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळविण्यास या उपक्रमाची मोलाची मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पत्रकार संवादिका’मध्ये पत्रकारांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रत्येक योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अन्य महत्त्वाच्या बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पत्रकारांना योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र माहिती शोधण्याची गरज भासणार नाही.

सामाजिक न्याय विभागाच्या घडीपत्रिकेमध्ये विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांची संक्षिप्त आणि उपयुक्त माहिती समाविष्ट करण्यात आली असून, नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन घडवून आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून या प्रकाशनाची निर्मिती साकार झाली असून, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच अनुसूचित जाती उपयोजना निधीतून या पुस्तिका व घडीपत्रिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी सामाजिक न्याय विभागाच्या घडीपत्रिकेची तर जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी ‘पत्रकार संवादिका’च्या निर्मितीमागील उद्देश आणि उपयुक्तता स्पष्ट केली. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत, पत्रकारांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही प्रकाशने प्रभावी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *