मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर केली होती. त्यावर आज प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले.
पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकतो, अशी भावना असणारे आणि परप्रांतीय मजुरांना जेवण देतानाही फोटो झळकवणारे इव्हेंट करत नाहीत का ? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सुध्दा ज्यांनी स्वत:ची छबी असणारी पोस्टर चिकटवली, त्यांनी दुसर्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करावे, असे आवाहनही महाडिक यांनी केले. महाराष्ट्र बचाव आंदोलनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यापासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांकडून व्यक्तीगत पातळीवर टिका होत आहे. गुरूवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टिका करताना, कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, असे म्हंटले होते. या टिकेचा आज प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी चांगलाच समाचार घेतला. पालकमंत्र्यांनाच प्रसिध्दीचा हव्यास आहे. गेले दोन महिने चंद्रकांतदादा कोठे होते, असा सवाल विरोधी पक्षातील मंडळी करत आहेत. पण प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदार संघात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे ही टिका निरर्थक आहे, असे महाडिक म्हणाले. शिवाय ज्यांनी गेल्या ८-१० दिवसात रेल्वेने जाणार्या परप्रांतीय कामगारांना दिलेल्या जेवणावर सुध्दा स्वत:चे फोटो झळकवलेे हा इव्हेंट नव्हे काय, असा सवाल धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यात आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वसामान्य- गोरगरीब जनतेला प्रचंड मदत केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्यक वस्तुंचे लाखो लोकांना वाटप झाले.
या उलट परप्रांतीयांना मदत करणार्या पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरीकांच्या गरजा, व्यथा- विवंचना सुध्दा जाणून घ्यायला हव्या होत्या. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात बसून कोरोना नियंत्रणात येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई-पुण्यातून येणार्या मुळच्या कोल्हापूरकरांना अडवले जात आहे. पण मानवतेच्या भावनेतून आणि ज्यांच्या घरातले लोक अडकले आहेत, त्यांची तगमग लक्षात घ्यायला नको का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारच्या मार्फत झाला आहे. शिवाय केंद्र सरकारनेही मुळात सवलत दिली आहे. तरीही आपणच परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च केला, असा आव आणणार्यांनी, रेल्वे खर्चाचा तपशिल जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावा, असे आवाहनही धनंजय महाडिक यांनी केले. तत्पूर्वी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्र सरकारने देशातील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय कारभारामुळे राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक चिघळत चालली आहे, असे मत धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. शेतकर्यांसह समाजातील सर्व गोरगरीब – कष्टकरी जनतेसाठी, महाविकास आघाडी सरकारने स्वतंत्र ५० हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही धनंजय महाडिक यांनी केली.