मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम सुरु झालेला असून 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची नोंद खर्च समिती तसेच सहायक निवडणूक खर्च निरीक्षक यांनी योग्य पध्दतीने घेऊन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणुका भयमुक्त आणि उत्साहाने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. प्रवीणकुमार यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित निवडणूक खर्च समिती व सहाय्यक निवडणूक निरीक्षक यांच्या आढावा बैठकीत डॉ. प्रवीणकुमार बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च समितीचे प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिशन राऊत, समाज कल्याणचे सहायक संचालक तथा संपर्क अधिकारी शाम देव यांच्यासह सर्व सहाय्यक खर्च निवडणूक निरीक्षक उपस्थित होते.
डॉ.प्रवीणकुमार म्हणाले की, जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत यापूर्वीच सर्व सहायक निवडणूक निरीक्षकांचे प्रशिक्षण झालेले आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला दिलेली जबाबदारी व कर्तव्याची जाण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे. प्रत्येक सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी शॅडो रजिस्टरवर उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदी व्यवस्थित घ्याव्यात. निवडणूक आयोगाच्या खर्चाबाबतच्या प्रत्येक निर्देशांचे तंतोतंत पालन प्रत्येकाने करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा निवडणूक प्रशासनाने खर्चाबाबतचे दरपत्रक खर्च समितीला उपलब्ध केलेले आहे. त्यानुसार उमेदवाराच्या प्रत्येक प्रचार रॅली, सभा, मेळावा व मतदारांच्या भेटीगाठीचे चित्रीकरण करावे तसेच त्या त्या वेळचा खर्च घेऊन त्याची नोंद घ्यावी व तो उमेदवारांच्या खर्चात दाखविला गेला आहे का ? याची तपासणी करावी. जर दाखविला गेला नसेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश डॉ. प्रवीणकुमार यांनी दिले.
खर्च समिती व सहायक निवडणूक निरीक्षकांनी परस्परांत समन्वय ठेवण्याबरोबरच निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या इतर समितीशीही योग्य तो संपर्क ठेवावा, असे डॉ. प्रवीणकुमार यांनी सांगितले.
प्रारंभी खर्च समितीचे प्रमुख श्री. जवळगेकर यांनी खर्च समितीमार्फत आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती देऊन प्रत्येकाच्या कामाचे स्वरुप त्यांनी सांगितले.
लातूर लोकसभा मतदार संघातील कोणत्याही नागरिकाला, मतदाराला निवडणुकीतील गैरप्रकार अथवा उमेदवाराच्या निवडणूक खर्चाविषयी तक्रार करायची असेल तर 02382-226663 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी डॉ. प्रवीणकुमार यांनी केले.