Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्यामुळे काही अटी व शर्तींच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी दिनांक १४ व १५ जुलै २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा इच्छुक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी केले आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन दि.१५ जुलै रोजी साजरा करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर दि. १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ऑनलाईन काऊन्सिलिंग, मॉडेल करिअर ठाणे येथील आशुतोष साळी व शासकीय आयटीआय सांगलीचे गटनिदेशक संजय सावंत हे कोविड- १९ नंतरची रोजगार स्थिती व मुलाखती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभही इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील विविध आस्थापना / कंपन्यामधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्ण संधी देवू केली आहे. यामध्ये जेसन्सफौंड्री प्रा. लि., विराज स्पिनर्स लि. युरेका फोर्ब्स, विटा यंत्रमाग औद्योगिक सह. संस्था, इंदिरा टेक्स, कमलसन टेक्सटाईल, मेरीट टेक्सटाईल्स, नवकार टेक्सटाईल्स, एल.आय.सी. सांगली, एल.आय.सी. इस्लामपूर हे उद्योजक सहभागी होणार आहेत.
या मेळाव्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिशियन, मोल्डर, वायरमन, वेल्डर, फिटर, टर्नर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, यंत्रमाग विव्हर, कांडीवाला, सफाई कामगार, सेल्स एक्झीक्युटिव्ह, इन्श्युरन्स ॲडवायजर, विमा प्रतिनिधी या सारख्या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच एसएससी, एचएससी, पदवीधर, डिप्लोमा उमेदवारांसाठी एकूण ४८१ पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा.
पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे हे उद्योजक व उमेदवार या उभयतांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफ लाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनी दि. १२ जुलै २०२० पर्यंत वेबपोर्टलवर पसंतीक्रम नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.