मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अशा बनावट नोटा तयारी करणारी व्यावसायिक टोळीस जेरबंद केले आहे.
त्यांच्याकडून दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या वीस लाखांच्या बनावट नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे ५२ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी बाळू सुलेमान नायकवडी या रेकॉर्डवरील फरारी आरोपीसह अन्य तिघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी देशमुख यांनी सांगितले की, या बनावट नोटा प्रविण नारायण गडकर (रा. गडबिद्री, ता. भुदरगड), विक्रम कृष्णात माने (वेडीव, ता. भुदरगड) यांनी संगनमत करून फोटोग्राफी व्यवसायातील मित्र गुरुनाथ दादू पाटील (रा. बामणे, ता. भुदरगड) याच्याकडून तयार करून घेतल्याचे सांगितले आहे. प्रविण गडकर, विक्रम माने तसेच गुरुनाथ पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.