मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.
कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात १२ हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू, असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.