कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटात संपूर्ण जिल्ह्यात दररोज सात हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची जिल्ह्याला गरज आहे . मात्र जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सध्या एकदेखील इंजेक्शन शिल्लक नाही .मात्र जिल्ह्यात काळा बाजार करून भरमसाठ दराने हे इंजेक्शन विकणारी समांतर यंत्रणा सक्रिय झाली आहे .
या यंत्रणेतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले .शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासने मैदान परिसरातील योगीराज राजकुमार वाघमारे आणि कसबा बावडा परिसरातील पराग विजयकुमार पाटील या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एकूण दोन लाख रुपये किमतीची अकरा इंजेक्शन्स जप्त केली .
अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, हवालदार सचिन पाटील, विलास किरुळकर, अमोल कोळेकर, सागर कांडगावे, अर्जुन बंदरे, संदीप कुंभार यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला .अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक सपना घुणकीकर यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली .