विशेष वृत्त : मार्था भोसले
अलीकडे गांधीनगरसह पंचक्रोशीत परप्रांतीयांकडून खून, चोरी, मारामारीसारखे गुन्हे वाढत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांबद्दल सतर्क रहा, असे आवाहन गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केले.
तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्री. घुले यांच्याशी याप्रश्नी चर्चा केली. त्यावेळी परप्रांतीयांकडून भूमिपुत्रांना होणाऱ्या नाहक त्रासाबद्दल उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, दीपक पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी कैफियत मांडली. गांधीनगर बाजारपेठेसह परिसरात रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांची नोंद संबंधित ग्रामपंचायतीकडे होणे आवश्यक आहे. संबंधित दुकानदाराने, फर्मने आपल्याकडे कामास असलेल्या परप्रांतीयांचे आधार कार्ड, ओळखपत्र ग्रामपंचायतीस सादर करणे अनिवार्य आहे. तसे झाल्यास परप्रांतीयांकडून परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला प्रतिबंध करता येईल.
परप्रांतियांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे स्थानिक भूमिपुत्र तरुणांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. परप्रांतीयांची लहान अज्ञान मुले अगर तरुण बाजारपेठेत दुकानांमधून कागद, बॉक्स स्क्रॅप, गोळा करता करता चोऱ्या करत आहेत. तशातच काही काळेधंदेवाले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांना आसरा देत आहेत त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे यांच्यासह शिवसैनिकांनी केली.
परप्रांतीयांची वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही गांभीर्याने पावले उचलत आहोत. संबंधितांची नोंद स्थानिक स्वराज्य संस्थेकडे होण्यासाठी प्रयत्न करू. तशी नोंद झाल्यास गुन्ह्याची उकल तात्काळ होईल व गुन्हेगारास शोधण्यात वेळ जाणार नाही, असे सत्यराज घुले यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, दिलीप सावंत, वीरेंद्र भोपळे, दिपक अंकल, उंचगाव फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, कैलास जाधव, बाबुराब पाटील, सूरज इंगवले, गणेश नागटिळक, किशोर कामरा, किरण चपटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.