मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि.30, राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 ची कार्यशाळा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली.
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व पर्यावरण रक्षणाची हरित शपथ घेऊन झाली. या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला . जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अध्यक्षीय भाषणात ‘पर्यावरण संवर्धन व रक्षण’ याबाबतचे महत्व अधोरेखित केले. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानात उत्साहाने सहभागी होऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले.
कार्यशाळेत राज्य शासनामार्फत नितेश होडबे व शिवानी मेहता यांनी या अभियानाची सर्वंकष माहिती सादर केली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी, सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सह आयुक्त हेमंत निकम यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. राज्य अभियान संचालक सुधाकर बोबडे यांच्या सहकार्याने कार्यशाळा पार पडली. शिरोळ मुख्याधिकारी तैमुर मुल्लानी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—————————-जाहीत———————-—–